कौटुंबिक वादातून रॉड, काठीने जबर मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 11:44 PM2017-08-30T23:44:49+5:302017-08-30T23:44:49+5:30
शहरातील बंजारा कॉलनीमध्ये कौटुंबिक वादातून दहा ते पंधरा जणांच्या टोळीने घरातील सदस्यांवर रॉड, काठीने फिल्मीस्टाईल मारहाण केल्याची घटना ३० आॅगस्ट रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला असून इतर चौघांनाही जबर मार लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर : शहरातील बंजारा कॉलनीमध्ये कौटुंबिक वादातून दहा ते पंधरा जणांच्या टोळीने घरातील सदस्यांवर रॉड, काठीने फिल्मीस्टाईल मारहाण केल्याची घटना ३० आॅगस्ट रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला असून इतर चौघांनाही जबर मार लागला आहे.
शहरातील बंजारा कॉलनीमध्ये मागील अनेक महिन्यांपासून सय्यद अफसर अली महम्मद अली हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. ३० आॅगस्ट रोजी सकाळी त्यांची लहान मुलगी सुमय्या बेगम हिस घेण्यासाठी सासरकडील मंडळी घरी आले होते. मात्र दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास मोठे जावई शेख नदीम याने अनोळखी १० ते १५ जणांना घेऊन आलेल्या पाहुण्यांवर व घरातील इतर सदस्यांवर लोखंडी रॉड तसेच लाकडी काठ्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली.
या मारहाणीत सय्यद निशाद, सुमय्या बेगम, जकीया सुलताना, जरीना चाऊस, सय्यद ख्वाजाबी हे पाच जण जखमी झाले. यात सय्यद निशाद यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना परभणी येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
दरम्यान, १० ते १५ जणांनी कुटुंबाच्या सदस्यांवर लोखंडी रॉड व काठ्यांनी अचानक हल्ला चढविल्यानंतर नागरिकांनी संबंधित घराकडे धाव घेऊन मध्यस्थी केली. त्यामुळे हल्लेकरू घटनास्थळावरून पसार झाले. बुधवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.