रोहित्र दुरुस्ती रखडली
By Admin | Published: April 24, 2016 11:51 PM2016-04-24T23:51:14+5:302016-04-25T00:42:59+5:30
बीड : बीड विभागाच्या ग्रामीण भागातील रोहित्रांची दुरूस्ती रखडलेली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रोहित्रांची दुरुस्ती,
बीड : बीड विभागाच्या ग्रामीण भागातील रोहित्रांची दुरूस्ती रखडलेली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रोहित्रांची दुरुस्ती, तर लांबच बिघडलेल्या अवस्थेत रोहित्र जागेवरच पडून आहेत. अशा रोहित्रांची संख्या ५०० पेक्षा अधिक असूनदेखील याबाबत अतिरिक्त कार्यकारी अभियंता इटकर अनभिज्ञ आहेत. रोहित्रांची दुरूस्ती रखडल्याने पंखे, कूलर बंद आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना घामाघूम व्हावे लागत आहे.
रोहित्रांसाठी आवश्यक असलेले आॅईल उपलब्ध नसल्याचे कारण अधिकारी सातत्याने पुढे करीत आहे. विभागात बीड ग्रामीणसह गेवराई, आष्टी, शिरूर, पाटोदा या तालुक्यांचा समावेश होतो. प्रत्येक तालुक्यात १०० पेक्षा अधिक रोहित्रांमध्ये बिघाड झाला आहे. दुरूस्तीकरिता याचा वाहतूकीचा खर्च कुणी करायचा, असा सवाल उपस्थित झाल्याने रोहित्र जागेवरच पडून आहेत. यामध्ये १००, ६३, २५, १५ के.व्हींचा समावेश आहे.
रोहित्रांच्या दुरूस्तीची कामे रखडल्याने दरवर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्या अनुषंगाने सध्याच्या कालावधीत रोहित्र दुरूस्तीची मोहीम हात घेणे आवश्यक असतानाही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आर्थिंगला पाणी पुरवठा होणेदेखील मुश्किल झाले आहे. यातच स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या अभियंता, लाईनमन यांना विभागातील अधिकाऱ्यांकडून सहकार्य होत नसल्यानेच जिल्हा भारनियमनमुक्त असतानाही विजेचा लपंडाव कायम आहे.
विभागात किती नादुरूस्त रोहित्रे आहेत, त्यांच्या दुरूस्तीकरिता कोणत्या साहित्याचा पुरवठा होणे गरजेचे आहे, अशा प्रकारची माहिती अधिकाऱ्यांनाच नसल्याने दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.
मुख्य कार्यालयाकडून रोहित्रांची पूर्तता झाली तरी नियम डावलून अधिकची रक्कम अदा करेल त्यालाच रोहित्र दिले जाते. यावर ना अधीक्षक अभियंत्याचा धाक राहिला आहे ना मुख्य अभियंत्याचा.
मनमानी कारभार
जास्तीची रक्कम भरणाऱ्या ग्राहकांनाच रोहित्र पुरविले जात आहे. याविषयी अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या विरोधात ढेकणमोहा येथील ग्रामस्थांनी तक्रार नोंद केली होती. अधीक्षक अभियंत्यांनीही समज देऊनही तेच प्रकार सुरु असल्याने ग्राहक त्रस्त आहेत. (प्रतिनिधी)
आॅनलाईनद्वारे बीड विभागाकडे सुमारे ६३ हजार लिटर आॅईल असल्याचे दाखविले जात आहे. प्रत्यक्षात एक थेंबही उपलब्ध नाही. आनॅलाईनद्वारे साहित्याचा पुरवठा व शिल्लक साठा वरिष्ठ कार्यालयाला कळविणे गरजेचे आहे. असे असताना आॅनलाईन प्रणालीकडे विभागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
रोहित्रांच्या दुरूस्तीकरिता प्रामुख्याने किटकॅट, केबल, लगझर यांचा तुटवडा कायम आहे; याशिवाय गाव स्तरावरील रोहित्रांवर अधिकचा ताण पडत आहे. रोहित्र फेल झाले तरी ते उतरविण्यास साहित्याअभावी दोराचा आधार घ्यावा लागत आहे.