सूक्ष्मजीवशास्त्राची भूमिका महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 01:39 AM2017-10-15T01:39:14+5:302017-10-15T01:39:14+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘महामायक्रोकॉन २०१७’ या भारतीय वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या परिषदेचे शनिवारी वर्षा ठाकू र यांच्या हस्ते उद्घाटन झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सूक्ष्मजीवशास्त्रातील तज्ज्ञांची जबाबदारी ही डॉक्टरांपेक्षा वेगळी आहे. उपचारात, तसेच रुग्ण ठणठणीत झाल्यानंतर केवळ डॉक्टरच समोर येतात; परंतु आजारांच्या पाठीमागील विषाणू शोधून, आजाराचे निदान करणारे सूक्ष्मजीवशास्त्रातील तज्ज्ञ हे कधीही समोर येत नाहीत, मात्र ते रुग्णांच्या उपचारात महत्त्वाची भूमिका निभावतात. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नवनवीन संशोधन करून पुढे जाण्याची गरज आहे, असे विभागीय उपायुक्त वर्षा ठाकूर म्हणाल्या.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘महामायक्रोकॉन २०१७’ या भारतीय वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या परिषदेचे शनिवारी (दि. १४) वर्षा ठाकू र यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, ‘पीएचएफआय’चे संचालक डॉ. सुभाष साळुंके, इंडियन असोसिएशन आॅफ मेडिकल मायक्रोबायोलॉजीचे अध्यक्ष डॉ. किशोर इंगोले, संयोजन अध्यक्ष डॉ. अजित दामले, संयोजन सचिव डॉ. ज्योती इरावणे (बजाज), डॉ. वीरेंद्र काशेट्टी, डॉ. छाया कुमार यांची उपस्थिती होती.
वर्षा ठाकूर म्हणाल्या, स्वाइन फ्लूसारख्या आजारांचा वेळोवेळी उद्रेक दिसतो. अनेक विषाणू औषधांना दाद देत नाहीत. औषधांचा कोणताही परिणाम दिसत नाही. त्यामुळे या बाबींवर संशोधनाची आवश्यकता आहे, असे त्या
म्हणाल्या. डॉ. येळीकर म्हणाल्या, एड्स, क्षयरोगासारख्या आजारांत या शाखेने महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यामुळे हे आजार नियंत्रणात आले. अनेक विषाणू हे डोळ्यांनी दिसत नाहीत; परंतु ते आरोग्यासाठी धोकायदायक ठरतात.
या क्षेत्रातील तज्ज्ञांनी आजारांचे मूळ शोधून त्यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे डॉ. कानन येळीकर म्हणाल्या. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ़ जयश्री भाकरे, डॉ़ अनिल गायकवाड, डॉ़ मंगला हरबडे, डॉ़ मुक्ता खापरखुंटीकर, डॉ़ लईक जाफरी, डॉ़ अर्जुन जाधव, डॉ़ अनुजा सामाले परिश्रम घेत आहेत़