भारताला विकसित देश बनविण्यासाठी ‘सीएं’ची भूमिका महत्त्वाची: भागवत कराड
By प्रशांत तेलवाडकर | Published: October 7, 2022 02:39 PM2022-10-07T14:39:42+5:302022-10-07T14:40:16+5:30
'द्रारिद्र्य निर्मूलन होत नाही, तोपर्यंत देशाचा विकास होत नाही. त्यासाठी गरीबांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. यासाठी ‘सीएं’नी आपले योगदान द्यावे.''
औरंगाबाद: ज्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे तोच देश विकास करू शकतो. आपल्यावर १५९ वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटनला मागे टाकून आपली अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर जाऊन पोहोचली आहे. भारताला विकसित देश बनविण्यासाठी चार्टर्ड अकाैंटंटची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ‘सीएं’ना मोठी मागणी असून, त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी व्यक्त केले.
‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाैंटंट्स ऑफ इंडिया’ने गुरुवारी (दि. ६) आयोजित दीक्षांत सोहळ्यात ते मार्गदर्शन करत होते. सातारा परिसरातील ‘आईसीएआय’ भवनात पश्चिम विभागातील १५० नवीन पात्र चार्टर्ड अकाैंटंट्सला या सोहळ्यात पदवी प्रदान करण्यात आली. महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. के. व्ही. एस. सरमा यांची विशेष उपस्थिती होती.
डाॅ. कराड यांनी सांगितले की, द्रारिद्र्य निर्मूलन होत नाही, तोपर्यंत देशाचा विकास होत नाही. त्यासाठी गरीबांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. यासाठी ‘सीएं’नी आपले योगदान द्यावे.
भारतातील न्यायिक प्रणालीमध्ये सहभागी होण्यासाठी व अनेक आर्थिक केसेसचा उलगडा करण्यासाठी ‘सीएं’नी कायद्याच्या पदवीसाठी प्रवेश घ्यावा़, असे आवाहन राष्ट्रीय विधी विद्यापीठ कुलगुरू डॉ. सरमा यांनी केले.
तत्पूर्वी सीए संघटनेचे अध्यक्ष देबशीस मित्रा व उपाध्यक्ष अनिकेत तलाठी यांनी दिल्लीहून ऑनलाईन मार्गदर्शन केले. केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य सीए उमेश शर्मा यांनी चार्टर्ड अकौंटंटच्या प्रत्येक स्पेलिंगचा अर्थ समजावून सांगितला व नव्याने पात्र ठरलेल्या ‘सीएं’ना शपथ दिली. प्रारंभी, सीए स्थानिक शाखेचे अध्यक्ष योगेश अग्रवाल, उपाध्यक्ष गणेश भालेराव, सचिव केदार पांडे, कोषाध्यक्ष अमोल गोधा, विकासा चेअरमन महेश इंदाणी, शाखा समितीच्या सदस्या रूपाली बोथरा यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
पूर्वी कुरिअरद्वारे मिळत असे पदवी
सीए उमेश शर्मा यांनी सांगितले की, पूर्वी कुरिअरने पदवी मिळत असे. औरंगाबादेत दीक्षांत सोहळा आयोजित करावा, अशी सर्वांची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली.