धर्मनिरपेक्षतेची पाळमुळ छत्रपतींच्या राज्यकारभारात; विजय चोरमारे यांचे औरंगाबादमध्ये प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 05:55 PM2018-02-19T17:55:46+5:302018-02-19T18:04:13+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकीय लढा हा मुस्लिम राजांसोबत होता. त्यात कोणताही धार्मिक वाद नव्हता. शिवाजींचे अंगरक्षकही मुस्लिम होते. तर त्यांच्या दरबारात सर्वजातीय, धर्माच्या लोकांना समान वागणूक मिळत होती. खर्या अर्थांने धर्मनिरपेक्षतेची पाळमुळे छत्रपतींच्या कारभारात होती, असे प्रतिपादन अभ्यासक विजय चोरमारे यांनी केले.
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकीय लढा हा मुस्लिम राजांसोबत होता. त्यात कोणताही धार्मिक वाद नव्हता. शिवाजींचे अंगरक्षकही मुस्लिम होते. तर त्यांच्या दरबारात सर्वजातीय, धर्माच्या लोकांना समान वागणूक मिळत होती. खर्या अर्थांने धर्मनिरपेक्षतेची पाळमुळे छत्रपतींच्या कारभारात होती, असे प्रतिपादन अभ्यासक विजय चोरमारे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महोत्सवात विजय चोरमारे यांचे ‘श्री छत्रपती शिवराय आणि समकालीन संदर्भ’ या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. कुलसचिव डॉ. साधना पांडे, विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मिक सरवदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. नंदकुमार राठी, अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके, शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. राम चव्हाण आणि विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. मुस्तजिब खान मंचावर उपस्थित होते.
छत्रपतींच्या भगव्याला बदनाम केले जात आहे
यावेळी विजय चोरमारे म्हणाले, सध्या भगव्या रंगाची भिती निर्माण झाली आहे. शिवकाळात भगवा म्हणजे विश्वासाचे प्रतिक होता. मात्र आता तिरंगा रॅलीमध्ये भगवे झेंडे घेऊन मुस्लिम वस्त्यांमध्ये धुडगूस घातला जात आहे. छत्रपतींच्या भगव्याला बदनाम केले जात आहे. ही बदनामी थांबविण्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहनही चोरमारे यांनी केले.
अध्यक्षीय समारोप कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केला. यात त्यांनी भुदल, नौदलाची निर्मिती करणारे शिवाजी महाराज हे एकमेव राजे असल्याचे सांगितले. पाहुण्यांचा परिचय संचालक डॉ. राम चव्हाण यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. मुस्तजिब खान यांनी केले. शिवजयंती महोत्सवात आयोजित स्पर्धातील विजेत्यांच्या पारितोषिकांचे वितरणही यावेळी करण्यात आले.
ढोल, ताशा अन् लेझीम पथकांचे देखावे
विद्यापीठात प्रवेशद्वार ते नाट्यगृहापर्यंत शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली होती. यात विद्यार्थ्यांनी भगवे फेट्यासह विशेष पेहराव परिधान केला होता. विद्यार्थिनींनी नऊवारी साड्या नेसून मिरवणूकीत देखावे सादर केले. ढोल, ताशा आणि लेझीम पथकांनी विविध कसरती सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनीही छत्रपतीची प्रतिमा असलेले टिशर्ट घालून कसरती सादर केल्या. सकाळी ९ वाजता निघालेली मिरवणूक तब्बल तिन तासानंतर नाट्यगृहापर्यंत पोहचली. तत्पूर्वी या तैलचित्र मिरवणूकीची सुरूवात कुलसचिव डॉ. साधना पांडे, डॉ. वाल्मिक सरवदे यांच्या उपस्थितीत झाली.