शिवसेनेची ‘एकला चलो रे’ची भूमिका कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:30 AM2018-04-20T00:30:05+5:302018-04-20T00:31:51+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा केलेला निर्धार कायम आहे. मराठवाड्यातील लोकसभा आणि विधासनसभा मतदारसंघांतील संभाव्य उमेदवार आणि पक्षपरिस्थितीचा ठाकरे यांनी गुरुवारी औरंगाबादेत आढावा घेतला.
औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा केलेला निर्धार कायम आहे. मराठवाड्यातील लोकसभा आणि विधासनसभा मतदारसंघांतील संभाव्य उमेदवार आणि पक्षपरिस्थितीचा ठाकरे यांनी गुरुवारी औरंगाबादेत आढावा घेतला.
केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना पक्षाच्या मुंबईत झालेल्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे शिवसेना प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत ‘एकला चले रो’ची घोषणा केली होती. यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला गोंजारणे सुरू केले होते. तसेच भाजप शिवसेनेसोबत युती करण्यास इच्छुक असल्याचेही स्पष्ट केले. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेचा ‘स्वबळा’चा नारा कायम असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांचा आढावा ठाकरे यांनी घेतला. मागील दीड महिन्यापूर्वी शिवसेनेतर्फे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात निरीक्षक पाठवून परिस्थितीची पाहणी केली होती. याचे अहवालही आजच्या बैठकीत पक्षप्रमुखांना सादर करण्यात आले. यात प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील इच्छुक, त्यांची ताकद, पक्षाची ताकद किती आहे, याची माहिती सादर केली. याशिवाय पक्षप्रमुखांनी संबंधित जिल्ह्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, जिल्हाप्रमुख, जिल्हा उपप्रमुख, तालुकाप्रमुख यांच्याशी संभाव्य नावांबाबतही माहिती जाणून घेतली आहे.
अनेक पदाधिकाऱ्यांची दांडी
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाºयांना पाचारण करण्यात आले होते. मात्र, या बैठकीला अनेक जिल्ह्यांतील काही प्रमुख पदाधिकाºयांनी दांडी मारली असल्याचे दिसून आले. यात प्रामुख्याने उस्मानाबादचे खासदार प्रा. रवी गायकवाड यांचा समावेश होता.
चौकट,
दानवाच्या वधासाठी अर्जुनाने धनुष्यबाण रोखलाय
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जालना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. दानवाचा वध करण्यासाठी अर्जुनाने धनुष्यबाण रोखला असल्याचे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले.