कोरोनामुक्त समाजासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:05 AM2021-07-11T04:05:46+5:302021-07-11T04:05:46+5:30
औरंगाबाद : कोरोनाने केवळ माणसांच्या शारीरिक आरोग्यावरच नव्हे, तर मानसिक आरोग्यावरही आघात केला आहे. शाळा, महाविद्यालये व कामे बंद ...
औरंगाबाद : कोरोनाने केवळ माणसांच्या शारीरिक आरोग्यावरच नव्हे, तर मानसिक आरोग्यावरही आघात केला आहे. शाळा, महाविद्यालये व कामे बंद असताना विद्यार्थी, तरुण, कुटुंबीयांना समजून घेणे महत्त्वाचे आहे. या काळात कोरोनामुक्त समाजासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची आहे, अशी भूमिका जयश्री जानी (अहमदाबाद) यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात आभासी पद्धतीने घेण्यात आलेल्या ‘कोरोना : मानसिक समुपदेशन’ कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर साळवे हे होते. या वेळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषदेच्या साधन व्यक्ती जयश्री जानी यांनी विविध घटना, प्रसंग, मनोवृत्ती आदींचा उलगडा करत कोरोनाची प्रासंगिकता- मानसिकता यावर सखोल भाष्य केले.
या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांचे निरसन केले. या कार्यशाळेत उपप्राचार्य प्रा. एन.एम. करंडे, डॉ. जी.डी. आढे, डॉ. व्ही.के. खिल्लारे, प्रा. एस.पी. खिल्लारे, डॉ. आर.व्ही. मस्के, प्रा. विजय आडे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी सहभागी झाले होते. डॉ. नवनाथ गोरे यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक डॉ. आशिष मालानी यांनी केले, तर डॉ. बी.एन. शिंदे यांनी आभार मानले.