काठावर पास ग्रामपंचायतींमध्ये रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:06 AM2021-02-05T04:06:06+5:302021-02-05T04:06:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सोयगाव : ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणानंतर आता ग्रामीण भागातील वातावरण चांगलेच तापले आहे. आता सरपंचाच्या खुर्चीवर कोणाची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सोयगाव : ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणानंतर आता ग्रामीण भागातील वातावरण चांगलेच तापले आहे. आता सरपंचाच्या खुर्चीवर कोणाची निवड होते, याची प्रतीक्षा लागली आहे. त्यामुळे काठावर पास झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांना सांभाळताना पॅनलप्रमुखांच्या नाकीनऊ येत आहेत.
सोयगाव तालुक्यात ४६ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यापैकी चाळीस ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड प्रक्रिया अद्याप बाकी आहे. मात्र, या निवड प्रक्रियेबाबत जिल्हा प्रशासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सरपंच आरक्षणानंतर गावागावातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यासाठी निवड झालेल्या सदस्यांना विश्वासात घेऊन मतदानाचा हट्ट धरला जात असल्याने इच्छुकांची दमछाक झाली आहे.
भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी असे तिहेरी समीकरण सोयगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये झाले आहे. त्यामुळे सरपंच आपल्याच पक्षाचा होण्यासाठी पुढाऱ्यांनी कंबर कसली आहे तर गाव पुढाऱ्यांना तालुक्यातील प्रमुख पुढाऱ्यांनी साद घातली आहे. सोयगाव तालुक्यात चार ग्रामपंचायती आणि २५ प्रभागातील ९२ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. परंतु, आरक्षण जाहीर होताच बिनविरोध निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींसाठीही चांगलीच रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुका झालेल्या गावातील राजकारणही तापू लागले आहे.
आमखेड्यात वादळी चुरस
आमखेडा ग्रामपंचायतीत भाजप - ५ आणि शिवसेना - ६ असे समीकरण झाले आहे. त्यामुळे सरपंच पदासाठी आमखेडा ग्रामपंचायतीत चुरस वाढली आहे. आमखेडा ग्रामपंचायत सोयगाव शहराला लागून आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या राजकारणाचा सोयगाव नगर पंचायतीवर परिणाम होईल, असे सांगितले जाते. बनोटी, गोंदेगाव, किन्ही, फर्दापूर, सावळदबारा, जामठी, देव्हारी, नांदातांडा, घोसला या ग्रामपंचायतींमध्येही सरपंच पदासाठीची चुरस वाढली आहे.