औरंगाबादेतील रोझ गार्डनचे काम पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:57 PM2018-01-28T23:57:53+5:302018-01-28T23:57:57+5:30
महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळातर्फे शहरात मजनू हिलच्या टेकडीवर रोझ गार्डन उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून निधी प्राप्त होत नसल्याने मागील एक वर्षापासून काम रखडले होते. मागील महिन्यात २ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी प्राप्त होताच रोझ गार्डनचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. जून २०१८ पर्यंत काम पूर्ण होणार असून, चार हजार वेगवेगळ्या प्रजातींच्या गुलाबांची झाडे पर्यटकांना येथे पाहायला मिळतील. राज्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळातर्फे शहरात मजनू हिलच्या टेकडीवर रोझ गार्डन उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून निधी प्राप्त होत नसल्याने मागील एक वर्षापासून काम रखडले होते. मागील महिन्यात २ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी प्राप्त होताच रोझ गार्डनचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. जून २०१८ पर्यंत काम पूर्ण होणार असून, चार हजार वेगवेगळ्या प्रजातींच्या गुलाबांची झाडे पर्यटकांना येथे पाहायला मिळतील. राज्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे.
या योजनेअंतर्गत टी. व्ही. सेंटर रोडवर मजनू हिल टेकडीवर रोझ गार्डन उभारण्यात येत आहे. या कामासाठी एमटीडीसीने खास वास्तूविशारद प्रदीप देशपांडे यांची नियुक्ती केली असून, कंत्राटदार व देशपांडे यांनी मुंबई व दिल्लीत योग्य शिष्टाई करून मागील महिन्यात २ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी खेचून आणला. महापालिका या प्रकल्पात नोडल एजन्सी म्हणून काम पाहत आहे. २०१६ मध्ये रोझ गार्डनसाठी पाथ वे तयार करणे, काळी खास माती आणून पाथ वे मध्ये टाकणे आदी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. केंद्राकडून निधी प्राप्त होत नसल्याने एक कोटी रुपये खर्च करून काम थांबविण्यात आले. आता निधी प्राप्त होताच पाथ वे वर आग्रा स्टोन बसविणे, बंगळुरू आणि म्हैसूर येथून वेगवेगळ्या प्रजातींची सुमारे चार हजार गुलाबांची झाडे आणण्यात येणार आहेत. पावसाळ्यापूर्वी झाडे लावण्याचे काम सुरू होईल. जूनअखेरपर्यंत उद्यानाचे काम पूर्ण होणार आहे. रोझ गार्डनमध्ये दोन पाण्याचे धबधबे तयार करण्यात आले आहेत. उद्यानाच्या मध्यभागी एक सुंदर पाण्याचे कारंजे उभारण्यात येईल. चारही बाजूंनी सुंदर गुलाबांची फुले राहतील.