वाहून गेली १ लाख कोटींची शेतमाल उलाढाल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 04:33 PM2019-11-28T16:33:14+5:302019-11-28T16:37:01+5:30
विभागीय आयुक्तालयाचा अंदाज
- विकास राऊत
औरंगाबाद : मराठवाड्यातील खरीप हंगामाचे अवकाळी पावसाने नुकसान केल्यामुळे विभागातील कृषी उत्पादनातून होणाऱ्या अंदाजे १ लाख कोटींहून अधिक रुपयांच्या उलाढालीवर पाणी फेरले गेले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी नांगरणी, मोगडणी, चरी पाडणे, बियाणे, निंदणे, खत खरेदी, युरिया आणि फवारणी, अंदाजे ४ वेळा वखरणी करण्यासाठी केलेला खर्च वाया गेला. आता सरकारी मदतीविना शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही राहिले नाही. पूर्ण १०० टक्के खरीप हंगाम हाती लागला असता, तर मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा कृषी उत्पादकता वाढण्याची शक्यता होती.
यंदाच्या खरीप हंगामात पावसाने सुरुवातीला कमी-अधिक हजेरी लावली. आॅक्टोबर पूर्वार्धापर्यंत पिकांची पस्थिती चांगली असतानाच उत्तरार्धात परतीच्या पावसाने मराठवाड्याला झोडपले. त्यात हाती आलेल्या खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. ४२ लाख हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा पिकांची उत्पादकता चांगली राहील असा अंदाज होता. मात्र, पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून नेला.
विभागात एकूण ५२ लाख ६५ हजार १६५.९६ हेक्टर खरीप हंगामाचे पेरणीलायक क्षेत्र आहे. त्यातील ४८ लाख ७० हजार १९४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. विभागातील ८ हजार ५१४ पैकी ८,४५० गावांना आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसाचा फटका बसला आहे. ४३ लाख १ हजार ४३६ पैकी ३० लाख २५ हजार ७६२ शेतकरी बाधित झाले. जिरायती आणि बागायती, फळबागा मिळून सुमारे ४१ लाख हेक्टर क्षेत्र आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे नष्ट झाले आहे. २,९०४ कोटी रुपयांची मदत शासनाकडून मिळण्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. त्यातील ८१९ कोटी रुपयांचा पहिला टप्पा विभागाला प्राप्त झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात ५०० कोटींचे अनुदान मिळणे शक्य आहे.
विभागीय प्रशासनाचे मत असे...
खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस या पिकांतून होणाऱ्या आर्थिक उलाढालीचा हिशेब केलेला नाही किंवा तशी आकडेवारी, माहिती अजून संकलित केली नाही; परंतु १ लाख कोटींहून कमी-अधिक उलाढाल होत असावी, असा अंदाज आहे.