Aurangabad Violence : दंगलीत १० कोटी २१ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:22 AM2018-05-16T01:22:03+5:302018-05-16T12:14:05+5:30
शहरात शुक्रवारी रात्री व शनिवारी दुपारपर्यंत शहरात झालेल्या दंगलीत दुकाने, वाहने व घरे या मालमत्तांचे १० कोटी २१ लाख १५ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा मंगळवारी सायंकाळी पूर्ण झाला.
औरंगाबाद : शहरात शुक्रवारी रात्री व शनिवारी दुपारपर्यंत शहरात झालेल्या दंगलीत दुकाने, वाहने व घरे या मालमत्तांचे १० कोटी २१ लाख १५ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा मंगळवारी सायंकाळी पूर्ण झाला. दंगलीतील नुकसानीचा अंदाज नागरिकांच्या बयानातून (जबाब) बांधण्यात आला आहे. त्या दंगलीत ६४ वाहने, ७५ घरे व दुकानांचे नुकसान झाले असून, १० कोटी २१ लाख १५ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद महसूल प्रशासनाने केलेल्या संयुुक्त पंचनाम्यात केली आहे. नागरिकांनी दिलेल्या बयान, माहितीनुसार हे पंचनामे करण्यात आले आहेत.
अप्पर तहसीलदार रमेश मुंदलोड, सतीश सोनी यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना मंगळवारी सायंकाळी पंचनाम्याचा प्राथमिक अहवाल सादर केला. राजाबाजार, नवाबपुरा, मोतीकारंजा, गुलमंडी, शहागंज येथे नुकसान झालेल्या पंचनाम्याची मूळ व बयानांची प्रत अहवालासोबत दिली आहे. दंगलीत झालेल्या नुकसानीत ६४ वाहने जळाली आहेत. वाहनधारकांनी दिलेल्या माहितीवरून हा आकडा समोर आला आहे. १ कोटी २७ लाख ७३ हजार ५०० रुपयांचे ते नुकसान आहे. तसेच ७५ घरेव दुकानधारकांच्या जबाबानुसार झालेल्या नुकसानीची रक्कम ८ कोटी ९३ लाख ४२ हजार १०० रुपये इतकी आहे. एकूण १३९ नागरिकांचे नुकसान झाले असून, त्याबाबत घेतलेल्या जबाबानुसार १० कोटी २१ लाख १५ हजार ६०० रुपयांचे ते नुकसान आहे.