कर्जाच्या आमिषाने १४ लाखांची फसवणूक, महिलेसह तिघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 07:30 PM2019-05-31T19:30:17+5:302019-05-31T19:32:34+5:30
फसवणूक झालेल्या लोकांची संख्या शेकडो होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
औरंगाबाद : कोट्यवधी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून तीन जणांना १४ लाख ८ हजार ५०० रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी एका महिलेसह तीन जणांना गुरुवारी अटक केली. अटकेतील आरोपींविरोधात शुक्रवारी आणखी २५ तक्रारी पोलिसांकडे आल्या. आरोपींनी केलेली फसवणूक कोट्यवधींची असण्याची आणि फसवणूक झालेल्या लोकांची संख्या शेकडो होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
दीपाली मिसाळ, संतोष शामराव आव्हाळे (रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) आणि विजय पंढरीनाथ शिंदे (४०, रा. मुकुंदवाडी), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यापैकी दीपाली मिसाळ ही नुकत्याच झालेल्या औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, सिडको एन-२ मध्ये आरोपींनी प्राईम कृषी विकासनिधी नावाचे बँकेसारखे कार्यालय सुरू केले होते. बँक ांच्या कर्जाचा थकबाकीदार असणाऱ्या ग्राहकांनाही ते कर्ज देतो, असे सांगत. याकरिता तीन महिने ते त्यांच्याकडे विशिष्ट नियमित पैसे भरण्यास सांगत. तीन महिने पैसे भरणाऱ्या ग्राहकांना चौथ्या महिन्यात कर्ज मिळेल, असे ते सांगत.
ही बाब समजल्यानंतर कापड व्यापारी सिद्दीक शफी अहेमद (रा. रहेमानिया कॉलनी) यांनी २५ फेब्रुवारी रोजी आरोपींची भेट घेतली आणि त्यांना साडेसात कोटी रुपये कर्जाची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपींनी त्यांना त्यांच्या कार्यालयात ४ लाख ८० हजार रुपये जमा केल्यास तुम्हाला आठ दिवसांत कर्ज देऊ असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून सिद्दीक यांनी आरोपींच्या कार्यालयात ४ लाख ८० हजार रुपये जमा केले. आठ दिवसांनंतर सिद्दीक यांनी आरोपींकडे कर्जाविषयी विचारणा केली तेव्हा सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड असल्याने एक दिवस थांबावे लागेल असे सांगितले.
यामुळे दुसऱ्या दिवशी सिद्दीक हे आरोपींच्या कार्यालयात जाऊन भेटले तेव्हा त्यांनी त्यांना कर्जाचा पहिला हप्ता म्हणून पावणे दहा लाखांचा धनादेश दिला. हा धनादेश त्यांनी बँकेत वटण्यासाठी टाकला असता, तो अनादर झाला. यामुळे सिद्दीक यांनी त्यांना फोन केला असता, आरोपींनी फोन घेण्यास टाळाटाळ केली. शिवाय ते कार्यालयातही भेटत नव्हते. यामुळे त्यांनी आरोपींविरोधात पोलिसांत तक्र ार नोंदविली. दुसरी तक्रार शेख अब्दुल खुद्दस यांनी दिली. त्यांच्या खातेदाराची ९ लाख रुपयांची, तर शेख अब्दुल यांची २८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले.