मुंबईतील दानशूरांची दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना २८ लाख रुपयांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 02:04 PM2019-03-13T14:04:17+5:302019-03-13T14:17:53+5:30
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याची अट संस्थेची होती
औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी मुंबईतील दानशूर व्यक्ती, संस्था सरसावल्या असून पहिल्या महिन्याचा निधी ९ लाख ४ हजार २०० रुपये मंगळवारी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याची माहिती दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांनी दिली.
या निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दुष्काळग्रस्त ८२२ विद्यार्थ्यांना चार महिने मोफत जेवण देण्यासाठी प्रति महिना ११०० रुपये दिले जाणार आहेत. यात ४७२ मुलांचा आणि ३५० मुलींचा समावेश आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी डॉ. काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने राज्यातील विविध स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्तींची भेट घेऊन दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी निधी जमा करण्याची जिम्मेदारी देण्यात आली होती. यात कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी कुलगुरू फंडातून १० लाख रुपये दिले होते. त्यानंतर डॉ. काळे यांनी विविध संस्था, व्यक्तींची भेट घेऊन निधी मिळविण्याचे प्रयत्न केले.
मुंबईतील ‘केअरिंग फें्रड्स’ या संस्थेचे निमेषभाई सुमती यांनी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा करणार असाल, तर २२ लाख रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले. यानुसार डॉ. काळे यांनी कुलगुरूंशी संपर्क साधून जेवणाऐवजी थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास मंजुरी घेतली. तसे पत्रही ‘केअरिंग फें्रड्स’ संस्थेला देण्यात आले. त्यानंतर संस्थेने तात्काळ १० लाख रुपयांचा पहिला हफ्ता विद्यापीठाच्या बँक खात्यात जमा केला. उर्वरित रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केल्याचा अहवाल दिल्यानंतर संस्था देणार आहे.
शिवाय मुंबईतील तीन दानशूरांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर ६ लाखांचा निधी दिला आहे. उस्मानाबाद उपकेंद्रातील ५० विद्यार्थ्यांनाही मदत केली जाणार असल्याचे काळे यांनी सांगितले.
४० लाख रुपये खर्च येणार
चार महिने विद्यार्थ्यांना जेवणाचे पैसे देण्यासाठी ३९ लाख ६० हजार रुपये एवढा निधी लागणार आहे. त्यापैकी १० लाख रुपये कुलगुरूंनी विद्यार्थी फंडातून दिले. उर्वरित पैशासाठी मुंबईतील दानशूरांनी २८ लाख रुपये देण्याचे मान्य केले. यानुसार विद्यार्थ्यांसाठी आवश्यक तेवढा निधी जमा झाला आहे. विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत विविध सदस्यांनी पोटतिडकीने दुष्काळग्रस्त निधी देणार असल्याचे जाहीर केले. मात्र, नरहरी शिवपुरेवगळता कोणीही मदत दिली नाही. गोदावरी शाळेतील प्रा. बंडू सोमवंशी यांनीही ११ हजार रुपयांचा निधी दुष्काळग्रस्तांना दिला असल्याचे प्रशासनाने सांगितले.
विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ तत्पर
मुंबईतील निमेषभाई सुमती, अंबाजोगाईतील अनिकेत लोहिया आदी दानशूर व्यक्तींचा लवकरच सत्कार केला जाईल. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून जावे लागणार नाही. यासाठी विद्यापीठ तत्पर असेल.
- डॉ. बी.ए. चोपडे, कुलगुरू