२९ हजार गरोदर महिलांना प्रत्येकी ५ हजार रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:09 AM2021-09-02T04:09:17+5:302021-09-02T04:09:17+5:30
औरंगाबाद : केंद्र शासनाने गरोदर महिलांसाठी पंतप्रधान मातृवंदना योजना २०१८ मध्ये सुरू केली. या योजनेंतर्गंत ऑगस्ट, २०२१ पर्यंत औरंगाबाद ...
औरंगाबाद : केंद्र शासनाने गरोदर महिलांसाठी पंतप्रधान मातृवंदना योजना २०१८ मध्ये सुरू केली. या योजनेंतर्गंत ऑगस्ट, २०२१ पर्यंत औरंगाबाद महापालिकेने २९ हजार ४९२ महिलांना योजनेचा लाभ मिळवून दिला. या योजनेत प्रत्येक गरोदर महिलेला तीन टप्प्यांत ५ हजार रुपयांचे आर्थिक साह्य देण्यात येते. औरंगाबाद महापालिकेला २८ हजार ६१० एवढे उद्दिष्ट देण्यात आले होते. उद्दिष्ट १०३ टक्के झाल्याचे महापालिकेतर्फे बुधवारी सांगण्यात आले.
मातृवंदना सप्ताह १ ते ७ सप्टेंबरपर्यंत साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे उद्घाटन बुधवारी राजनगर आरोग्य केंद्रावर मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्त तेथे सेल्फी पाइंट उभारण्यात आला. लाभार्थी मातांना फळे वाटप करण्यात आली. या सप्ताहांतर्गंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गरोदर महिलांचे लसीकरण, आहाराबद्दल माहिती, योजनेत समावून घेण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन, गरोदर मातांसाठी पौष्टिक पदार्थ बनविण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहेत. कार्यक्रमास डॉ.प्रेमलता कराड, जिल्हा कार्यक्रम समन्वयक रूपाली कुमावत, समन्वयक माजीद खान, डॉ.गंडे पाटील आदींची उपस्थिती होती.