५१० रुपयांचे अँटिजन किट आता अवघ्या ५७ रुपयांमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:04 AM2021-04-01T04:04:21+5:302021-04-01T04:04:21+5:30
औरंगाबाद : मागील वर्षी मार्च महिन्यात ५१० रुपयांमध्ये प्रत्येकी एक अँटिजन किट देणाऱ्या दिल्ली येथील कंपनी आता केवळ ५७ ...
औरंगाबाद : मागील वर्षी मार्च महिन्यात ५१० रुपयांमध्ये प्रत्येकी एक अँटिजन किट देणाऱ्या दिल्ली येथील कंपनी आता केवळ ५७ रुपयांमध्ये हे किट महापालिकेला विक्री करण्यास तयार असल्याने आधी प्रचंड महाग दराने या किटची का विक्री केली, असा सवाल विचारत महापालिकेने कंपनीचे बिल थांबवून ठेवले आहे. महापालिकेने वर्षभरात तब्बल १५ कोटी रुपयांच्या किटची खरेदी केली आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यात अचानक कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर तपासणीसाठी लागणारे किट कोठून घ्यावेत, असा प्रश्न महापालिकेला पडला होता. दिल्ली येथील एका कंपनीकडून जीएसटीसह ५१० रुपयांमध्ये एका किटची खरेदी केली. नंतर किट विक्रीत प्रचंड स्पर्धा सुरू झाली. दररोज दर खाली येऊ लागले. त्यामुळे वर्षभरानंतर अवघ्या ५७ रुपयांपर्यंत हे दर आले आहेत. महापालिकेने मागील वर्षभरात जवळपास पाच लाख नागरिकांची तपासणी केली आहे. ५० टक्के अँटिजन किटचा वापर करण्यात आला. या किटचा खर्च जवळपास पंधरा कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. संबंधित कंपनीला काही प्रमाणात रक्कम अदा करण्यात आलेली आहे. उर्वरित रक्कम मागील पाच-सहा महिन्यांपासून देण्यात आलेली नाही. थकबाकीसाठी कंपनीकडून पाठपुरावा सुरू झाला आहे. नियमानुसार कंपनीला बिल द्यावेच लागणार आहे. सध्या किटचे दर कमी झाल्याने जुन्या रकमेत काही सूट मिळेल का, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. कंपनी कोणत्याही परिस्थितीत दर कमी करायला तयार नाही. त्यामुळे संबंधित कंपनीचे बिल वादात सापडले आहे.
आणखी अडीच लाख किटची खरेदी
सध्या कोरोनाचा संसर्ग बराच वाढला आहे. सध्या महापालिकेकडून दररोज किमान दीड ते दोन हजार अँटिजन किटद्वारे तपासणी करण्यात येत आहे. शासन निर्देशानुसार तपासणीचे प्रमाण दुप्पट करण्यात येणार आहे. दररोज ५ हजार अँटिजन किटद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिका आणि अडीच लाख किट खरेदीची ऑर्डर दिली आहे.