७० कोटी रुपये कर्जाच्या आमिषाने मुंबईतील दलालांकडून पावणेनऊ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:24 PM2018-11-24T23:24:35+5:302018-11-24T23:25:06+5:30
औरंगाबाद : दरसाल दर शेकडा ७ रुपये दराने तब्बल ७० कोटी रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील कथित फायनान्स ...
औरंगाबाद : दरसाल दर शेकडा ७ रुपये दराने तब्बल ७० कोटी रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील कथित फायनान्स कंपनी आणि दोन दलालांनी शहरातील एक जणाला तब्बल ८ लाख ८९ हजार रुपयांचा गंडा घातला. २४ मे २०१७ ते २३ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत झालेल्या या फसवणूकप्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
दिनेश जैन, अशरफ खान, सुनील संकपाळ, जितू आणि विपुल पांडे, अशी गुन्हा दाखल झालेल्या दलाल आणि के. के. जैन फायनान्स कंपनीचे संचालक, व्यवस्थापकांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, भाग्यनगर येथील मनोज सुरेशचंद्र बाकलीवाल हे रिअल इस्टेट ब्रोकर आहेत. मुंबईतील दलाल सुनील आणि जितू हे त्यांच्या ओळखीचे आहेत. मनोज यांना व्यवसाय वाढवायचा असल्याने त्यांना पैशाची आवश्यकता आहे, ही बाब सुनील आणि जितू यांना माहीत होती. मुंबईतील के. के. जैन फायनान्स क ॉर्पोरेशनकडून तुम्हाला कर्ज मिळवून देतो, असे सुनीलने मनोज यांना जून २०१७ मध्ये सांगितले. तेव्हा मनोज यांनी त्यांना किती क र्ज मिळेल, अशी विचारणा करून सांगितले की, त्यांच्याकडे बीड बायपासवर ८० कोटी रुपये किमतीची मालमत्ता आहे. तेव्हा फायनान्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अशरफ खान आणि दिनेश जैन यांना विचारून सांगतो, असे सुनील म्हणाला. त्यानंतर काही दिवसांनी मनोज हे कामानिमित्त मुंबईला गेले असता सुनील आणि विपुल पांडे यांनी त्यांची ओळख अशरफ खानसोबत करून दिली. त्या दिवशी दिनेश हे बाहेरगावी होते. सुनीलने त्यांना सांगितले की, तुमच्या मालमत्तेच्या किमतीच्या ९० टक्के म्हणजे ७० कोटी रुपये तुम्हाला कर्ज मिळेल. कर्जाचा व्याजदर ७ टक्के असेल. तुम्हाला एक लाख रुपये कंपनीकडे सुरक्षा रक्कम म्हणून जमा करावी लागेल. या रकमेवर २५ टक्के दराने व्याज मिळेल; परंतु ती रक्कम तुम्हाला काढता येणार नाही. शिवाय प्रोसेसिंगसाठीचा खर्च करावा लागेल. तुम्ही विपुल आणि सुनील यांच्या खात्यावर पैसे जमा करा, असे अशरफने सांगितले. मनोज यांनी प्रथम एक लाख रुपये सुनीलने दिलेल्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे आॅनलाईन वर्ग केले. त्यानंतर ७ लाख ३० हजार आणि रोखीने २ लाख ५९ हजार रुपये आॅनलाईन अदा केले. पैसे घेतल्यानंतर त्यांनी कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मनोज यांनी क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक जी. पी. सोनटक्के तपास करीत आहेत.