दंड न भरल्याने आरटीओने कार जप्त केली, बेरोजगार अभियंत्याने रात्रीतून चोरून नेली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 04:00 PM2024-10-01T16:00:01+5:302024-10-01T16:00:39+5:30
वेदांतनगर पोलिसांनी केली अटक
छत्रपती संभाजीनगर : दंड प्रलंबित असल्याने आरटीओने जप्त केलेली कार विनंती करूनही न सोडल्याने बेरोजगार अभियंत्याने ती थेट रात्रीतून चोरून नेली. सोमवारी ही घटना उघडकीस आली. राहुल सुनील जठार (२८, रा. जठार वस्ती, ता. वैजापूर) असे त्याचे नाव असून, वेदांतनगर पोलिसांनी त्याला गावातून अटक केली.
तीन महिन्यांपूर्वी आरटीओच्या पथकाने राहुलची कार (एमएच ०५ बीजे १६६७) जप्त केली होती. तिच्यावर ३४ हजारांचा दंड प्रलंबित होता. त्यानंतर राहुलने ती सोडवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्याला यश मिळाले नाही.आरटीओने जप्त केलेल्या त्याच्या कारसह अन्य पाच कार रेल्वेस्थानक परिसरातील कार्यालयात उभ्या केल्या होत्या. रविवारी पहाटे त्यापैकी एक कार आढळून आली नाही. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सविता पवार यांच्या तक्रारीवरून रविवारी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही फुटेजवरून शोध
निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या आदेशावरून उपनिरीक्षक वैभव मोरे, अंमलदार बाळाराम चौरे, रणजीतसिंग सुलाने, विलास डोईफोडे प्रवीण मुळे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले केले. त्यातील चोराच्या अंगकाठीवरून पोलिसांनी कार मालकाचे घर गाठले. राहुलला ताब्यात घेतल्यानंतर त्यानेच कार चोरल्याची कबुली दिली.
कार कुठे ठेवली, सांगितलेच नाही
राहुलने रविवारी मध्यरात्री ३ वाजता बनावट चावीने आरटीओ कार्यालयात प्रवेश करून कार लंपास केली. ती कुठे ठेवली, हे मात्र त्याने पोलिसांना सांगितले नाही. राहुलने शहरातील नामांकित महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. काही महिन्यांपूर्वी तो पुण्यात नोकरी करत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्याला नाेकरी नसल्याचे तो घरीच होता.