मराठवाड्यातील आरटीओ निरीक्षकांची पळवापळवी; २१ निरीक्षक गेले, मिळाले फक्त एक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 06:30 PM2021-09-09T18:30:22+5:302021-09-09T18:32:01+5:30
मराठवाड्यातून बदली होऊन गेलेल्या २१ निरीक्षकांच्या ठिकाणी आता कर्मचारी येण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
- संताेष हिरेमठ
औरंगाबाद : कधी मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पळविले जाते, तर कधी शैक्षणिक संस्था. आता तर मराठवाड्यातील आरटीओ निरीक्षकांचीही पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पळवापळवी केली जात आहे. राज्यात गेल्या महिनाभरात राज्यातील १८५ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. यात मराठवाड्यातून २१ निरीक्षक गेले. मात्र, त्या बदल्यात केवळ एक निरीक्षक मराठवाड्याला मिळाले.
औरंगाबादसह नांदेड, परभणी, हिंगोली, बीड येथील २१ निरीक्षकांच्या बारामती, मुंबई (मध्य), ठाणे, मुंबई (पश्चिम), पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, चंद्रपूर, सांगली, वर्धा, सातारा आदी ठिकाणी बदल्या करण्यात आल्या, तर लातूर येथून उमरगा येथे आणि उमरगा येथून लातूरला दोघांची बदली झाली. यात काही विनंतीनुसारही बदल्या करण्यात आल्या आहेत. १८५ जणांमध्ये वाशिम येथून एका मोटार वाहन निरीक्षकाची लातूर येथे बदली झाली; परंतु मराठवाड्यातून बदली होऊन गेलेल्या २१ निरीक्षकांच्या ठिकाणी आता कर्मचारी येण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. निरीक्षक नसल्याचा थेट परिणाम आरटीओ कार्यालयातील कामकाजावर होत आहे. अपुऱ्या निरीक्षकांच्या जोरावरच कामकाज करावे लागत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील मोटार वाहन निरीक्षक कार्यालयांपुरतेच राहत आहेत. रस्त्यांवर नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनांवर करवाईचा सगळा भार वाहतूक पोलिसांवर येत आहे.
१५ लाख वाहनांसाठी १७ निरीक्षक
औरंगाबाद जिल्ह्यातील वाहनांची संख्या १५ लाख ३१ हजारांवर गेली आहे. आरटीओ कार्यालयात मोटार वाहन निरीक्षकांची ३० पदे मंजूर आहेत. त्यामुळे आजघडीला १७ पदे भरलेली आहेत, तर १३ पदे रिक्त आहेत. निरीक्षकांअभावी आरटीओ कार्यालयास मिळालेली ३ अत्याधुनिक वाहने अजूनही कार्यालयातच उभी राहत आहेत.
सर्वसामान्य वाहनचालकांना फटका
मराठवाड्यावर नेहमीच अन्याय केला जात आहे. आरटीओ कार्यालयातील रिक्त पदे भरली जात नाही. त्याचा फटका सर्वसामान्य वाहनचालकांना बसत आहे. लायसन्स मिळण्यासाठी दोन-दोन महिने प्रतीक्षा करावी लागते. शासनाने रिक्त पदे तर भरलीच पाहिजेत, बदली होऊन कर्मचारी गेल्यानंतर त्या जागी लगेच अन्य कर्मचारी पाठविले पाहिजेत.
- किरण दळवी, सचिव, महाराष्ट्र मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटना