भर महामार्गावर ट्रक आरटीओच्या टीमने थांबवला म्हणून मागून येणारी मिनीबस या ट्रकवर आदळली: अंबादास दानवे
By संतोष हिरेमठ | Published: October 15, 2023 12:41 PM2023-10-15T12:41:06+5:302023-10-15T12:41:22+5:30
चौकशी करून दोषींवर कारवाई करू- दादा भुसे
संतोष हिरेमठ
छत्रपती संभाजीनगर : रात्री भर महामार्गावर ट्रक आरटीओच्या टीमने थांबवला म्हणून मागून येणारी मिनीबस या ट्रकवर आदळली. हा मानवनिर्मित अपघात आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. तर या अपघातप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे म्हणाले.
अंबादास दानवे, दादा भुसे यांनी समृद्धी महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेत त्यांना धीर दिला. घाटी रुग्णालयात दाखल रुग्णांची भेट घेत दादा भुसे यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारणा केली.
अंबादास दानवे म्हणाले, इंटरचेंजवरील टोल नाका क्रॉस करून समृद्धी महामार्गाला लागण्यापूर्वी प्रादेशिक परिवहन विभागाच्या लोकांनी वाहनांची तपासणी करणे आवश्यक आहे. रात्री भर महामार्गावर ट्रक आरटीओच्या टीमने थांबवला म्हणून मागून येणारी मिनीबस या ट्रकवर आदळली. हा मानवनिर्मित अपघात आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे.
समृद्धी महामार्ग हा आता धंद्याचा महामार्ग बनला असून जे आरटीओ अधिकारी त्यावेळी अपघातस्थळी कर्तव्यावर होते, त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. अशावेळी भर महामार्गावर गाडी थांबवणं चुकीचं आहे तसं क्षमतेपेक्षा अधिक लोक बसवून नेणेही चुकीचच आहे.