छत्रपती संभाजीनगरची रुद्राणी शर्मा जेईई मेन्स बी.आर्किटेक्चर परीक्षेत महिलासह खुल्या गटात देशात प्रथम
By राम शिनगारे | Published: March 14, 2024 03:02 PM2024-03-14T15:02:20+5:302024-03-14T15:04:32+5:30
जेईई मेन्स बी.आर्किटेक्चर परीक्षा : राज्यातही प्रथम येण्याचा मिळाला बहुमान
छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) दि.२४ जानेवारी रोजी बॅचरल ऑफ आर्किटेक्चर (बी.आर्च.) अभ्यासक्रमासाठी घेतलेल्या संयुक्त प्रवेशपरीक्षा मुख्य (जेईई मेन्स) चा निकाल दि. ६ मार्च रोजी जाहीर झाला आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर विद्यार्थिनी रुद्राणी उमेश शर्मा हिने एनटीए ९९.९९८०६०९ स्कोअर मिळवत खुल्या व महिला प्रवर्गात देशात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच तिने महाराष्ट्रातूनही प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला.
'एनटीए'कडून बी.आर्च व बी.प्लॅनिंग या अभ्यासक्रमाच्या स्कूल ऑफ प्लॅनिंग ॲण्ड आर्किटेक्चर (एसपीए) संस्थांमधील प्रवेशासाठी दि.२४ जानेवारी रोजी जेईई मेन्स परीक्षा घेतली. देशभरातून दोन्ही अभ्यासक्रमांसाठी ७ लाख ४० हजार २ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. देशातील २८४ व देशाबाहेरील १५ अशा एकूण २९९ शहरांतील ४२१ केंद्रांवर ही परीक्षा घेतली. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ५५ हजार ६०८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षेला हजेरी लावली. या परीक्षेचा निकाल एनटीएच्या संकेतस्थळावर दि. ६ मार्च रोजी जाहीर झाला आहे. त्यात सिक्कीम राज्यातील मुथू आर. या विद्यार्थ्याने बी.आर्च.मध्ये एनटीए १०० स्कोअर मिळवत देशातून प्रथम येण्याचा मान मिळवला. त्याचवेळी छत्रपती संभाजीनगरच्या रुद्राणी उमेश शर्मा हिने एनटीए ९९.९९८०६०९ स्कोअर मिळवत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला. त्याशिवाय खुला प्रवर्ग व महिला गटातून देशात प्रथम येण्याचा मान मिळविला. तर, जेईई मेन्सच्या बी. प्लॅनिंग अभ्यासक्रमांच्या जेईई मेन्स परीक्षेत महाराष्ट्रातून शशांक मंगल याने एनटीए ९९.८७१३६२ स्कोअर मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
यशामुळे जबाबदारी आणखी वाढली
'एनटीए'कडून बी.आर्च. अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेत महिलासह खुल्या प्रवर्गात देशातून प्रथम येण्याचा मान मिळाला आहे. त्याशिवाय महाराष्ट्रातही प्रथम स्थान मिळाले. या यशामुळे आता जबाबदारी आणखी वाढली आहे. ती पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन.
- रुद्राणी शर्मा, महिलासह खुल्या प्रवर्गातून प्रथम, जेईई मेन्स बी.आर्च. परीक्षा