‘मशिप्रमं’वर पुन्हा सत्ताधारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:31 AM2018-06-05T01:31:02+5:302018-06-05T01:31:19+5:30
मराठवाड्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळावर सत्ताधाऱ्यांचीच फेरनिवड झाली. अध्यक्षपदी प्रकाश सोळंके यांची तर सचिवपदी आमदार सतीश चव्हाण विजयी झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळावर सत्ताधाऱ्यांचीच फेरनिवड झाली. अध्यक्षपदी प्रकाश सोळंके यांची तर सचिवपदी आमदार सतीश चव्हाण विजयी झाले. विरोधी मधुकरअण्णा मुळे गटातील सदस्यांनी हजेरी लावत सर्वच पदांसाठी उमेदवार दिल्यामुळे हात उंचावून मतदान घ्यावे लागले.
‘मशिप्र’ मंडळाच्या पंचवार्षिक केंद्रीय कार्यकारिणीच्या निवडीसाठी देवगिरी महाविद्यालयातील रवींद्रनाथ टागोर सभागृहात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अध्यक्ष, २ उपाध्यक्ष, सचिव, २ सहसचिव, कोषाध्यक्ष आणि १४ कार्यकारिणी सदस्यांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत १६१ आजीव आणि नव्याने नोंदविण्यात आलेले १८२, अशा एकूण ३४३ सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. मात्र प्रत्यक्षात ३३० सदस्यांनीच मतदानात भाग घेतला. आ. चव्हाण गटातर्फे अध्यक्षपदासाठी प्रकाश सोळंके तर मधुकरअण्णा मुळे गटातर्फे डॉ. लव पानसंबळ यांनी अर्ज दाखल केला. प्रकाश सोळंके यांना २८१ मते पडली. तर डॉ. पानसंबळ यांना ५१ मते पडली. मात्र चार सदस्यांनी दोन्ही बाजूने हात वर केल्यामुळे पुन्हा मतदान घेण्याची मागणी झाली. यावर पुन्हा मतदान झाले. यात प्रकाश सोळंके यांना २७७ आणि डॉ. पानसंबळ यांना ५२ मते पडली. दोन उपाध्यक्षपदासाठी आ. चव्हाण गटातर्फे आमदार अमरसिंह पंडित यांना २७९ आणि सलीम शेख यांना २७७ मते पडली. तर मुळे गटाच्या शिवाजीराव नखाते यांना ५० आणि त्र्यंबक देशमुख यांना ४९ मते पडली. मंडळातील सर्वात महत्त्वाच्या अशा सचिवपदासाठी आ. सतीश चव्हाण यांना २८०, तर मुळे गटाच्या किरण जाधव यांना अवघी ५० मते मिळाली. दोन सहसचिवपदासाठी आ. चव्हाण गटाचे अनिल नखाते यांना २७८ आणि प्रभाकर पालोदकर यांना २८९ मते पडली. मुळे गटाचे रवींद्र जाधव यांना ५० आणि शंकरराव मगर यांना ५१ मते मिळाली. कोषाध्यक्षपदासाठी आ. चव्हाण गटाचे डॉ. अविनाश येळीकर यांना २७९ तर विरोधी मुळे गटाचे गंगाधर जगताप यांना ५१ मते पडली.
सत्ता असताना मुळे घराणे; सत्ता नसताना इतर
मंडळावर जेव्हा मधुकरअण्णा मुळे यांच्या कुटुंबाचे वर्चस्व होते. तेव्हा कुटुंबाशिवाय इतरांना कोणत्याही पदांवर संधी मिळत नसे. मात्र बहुमत नसताना पराभव स्वीकारण्यासाठी इतरांना उभे केल्याची टीका पत्रकार परिषदेत अध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी केली.
मुळे यांच्या कार्यकाळात तब्बल १९३ नवीन सदस्य बनविण्यात आले होते. आम्ही १८२ नवीन सदस्य बनविले. त्यावर आक्षेप घेण्यात आला. मात्र जुन्या १६१ सदस्यांनाही मतदानाचा अधिकार दिल्यानंतर त्यातील ११० मते आमच्या बाजूने पडली.
मुळे गटाला केवळ ५० मतापर्यंत मजल मारता आली. हा त्यांचा दारुण पराभव असल्याचेही सोळंके यांनी सांगितले. यावेळी आ. सतीश चव्हाण यांनी संस्थेच्या विकासासंदर्भात मतप्रदर्शन केले.