औरंगाबाद विद्यापीठाची अधिसभा निवडणूक पुढे ढकलल्याची सोशल मिडियावर अफवा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 08:31 PM2017-11-22T20:31:35+5:302017-11-22T20:32:57+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. ही निवडणूक औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार पुढे ढकलल्याच्या अफवा सोशल मिडियावर उठवल्या आहे.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. ही निवडणूक औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार पुढे ढकलल्याच्या अफवा सोशल मिडियावर उठवल्या आहे. याविषयी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांना विचारले असता, त्यांनी असा कोणताही निर्णय झालेला नसून, या अफवा असल्याचे सांगितले.
विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न झालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यपकांना मतदानाचा अधिकार दिल्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. याविषयी बुधवारी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली आहे. यावर कोणाताही निर्णय झाला नसून, पुढील सुनावणी शुक्रवारी (दि. २४) होणार आहे. मात्र याच दिवशी मतदान आहे. याविषयी सोशल मीडियावर काही लोकांनी मेसेज टाकून औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने निवडणूक स्थगित झाली असून, निवडणुकीची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचे टाकले आहे. यामुळे शिक्षण वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याविषयी विद्यापीठाच्या कुलसचिव तथा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या अफवा असल्याचे स्पष्ट केले. विद्यापीठाने निवडणूकीसाठी स्वतंत्रपणे पोर्टल तयार केलेले आहे. त्यावर देण्यात येणारी सूचना ही अधिकृत असते. त्यावर निवडणूक पुढे ढकलली किंवा काही बदल झाले याविषयी कोणतेही पत्र टाकण्यात आलेली नाही किंवा न्यायालयाने असा कोणाताही निकाल दिल्याचे विद्यापीठ प्रशासनापर्यंत पोहचलेले नसल्यामुळे पुर्वनियोजित वेळापत्रकानुसार निवडणूक होत आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही, असेही डॉ. पांडे यांनी स्पष्ट केले.
अफवा पसरविणा-यावर गुन्हे दाखल करा
विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढे ढकलल्याची अफवा विद्यापीठ विकास मंचचे संस्थाचालक गटातील उमेदवार चंद्रकांत मुळे यांनी सोशल मिडियावर पोस्ट टाकून उठवली असल्याचा आरोप मुप्टाचे संस्थापक सचिव प्रा. सुनिल मगरे यांनी केला. एका उमेदवाराने न्यायलयाचा हवाला देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाने मुळे यांच्यावर अफवा पसरविल्याचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. याविषयी उमेदवार चंद्रकांत मुळे यांना विचारले असता त्यांनी संबंधित मेसेज चुकीने पाठविण्यात आला असून, त्याबद्दल दिलगीर असल्याचे सांगितले.