भूमाफियांनी पसरवली खाम नदीपात्रात पाडापाडी होणार असल्याची अफवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 03:11 PM2018-12-27T15:11:35+5:302018-12-27T15:16:38+5:30
गोरगरीब नागरिकांकडून स्वस्त दरात घरे विकत घेऊन नंतर चढ्या दराने विक्री करण्याचा हा डाव असू शकतो.
औरंगाबाद : खाम नदीपात्रात दोन्ही बाजूने ३०० फुटांपर्यंत पाडापाडी करण्यात येणार असल्याची अफवा या भागातील काही भूमाफियांनी पसरविली आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या हजारो नागरिकांची झोप उडाली आहे. भूमाफियांनी महापालिकेच्या नावाने संगणकावर चक्क एक बोगस ऑर्डर तयार केली. ही ऑर्डर सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. खंडपीठाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येणार असल्याचे ऑर्डरमध्ये भूमाफियांनी नमूद केले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही ऑर्डर, त्यावरील सह्या बोगस असल्याचा निर्वाळा दिला आहे.
२०११-१२ मध्ये खाम नदीपात्रात महापालिकेने मोठी कारवाई केली होती. नदी पात्राचा मध्यबिंदू पकडून दोन्ही बाजूने १०० फुटांपर्यंतची सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त केली होती. या कारवाईत शेकडो नागरिकांना बेघर व्हावे लागले होते. नदीपात्राच्या दोन्ही बाजूने आज किमान दहा हजारांहून अधिक घरे असून ती पाडण्यात येणार आहेत, खंडपीठाने महापालिकेला आदेश दिले अशा तोंडी अफवा अगोदर पसरविण्यात आल्या. त्यानंतर भूमाफियांनी एक बोगस ऑर्डर तयार केली. अतिक्रमण हटाव विभागाने ही ऑर्डर जारी केल्याचे दाखविण्यात आले. नदीपात्रातील मध्यभाग दर्शविणारा नकाशा ऑर्डरवर काढण्यात आला आहे. या ऑर्डरवरील जावक क्रमांकही चुकीचा आहे. सध्या ही ऑर्डर नदीपात्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलमध्ये आहे. महापालिका अतिक्रमण हटाव विभागातील सूत्रांनी सांगितले की, अशा पद्धतीची कोणतीच ऑर्डर आमच्याकडून तयार केली नाही.
नागरिकांनी घरे विकावीत म्हणून
खाम नदीच्या आसपास किमान ५०० पेक्षा अधिक जमिनीचा व्यवहार करणारे, दलाल आहेत. मागील काही दिवसांपासून या मंडळींना कामच उरलेले नाही. त्यामुळे त्यांनी ही खोटी अफवा पसरविली असावी, असे मनपा सूत्रांचे मत आहे. सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांकडून स्वस्त दरात घरे विकत घेऊन नंतर चढ्या दराने विक्री करण्याचा हा डाव असू शकतो.
मनपाकडून पोलीस तक्रार नाही
महापालिकेच्या नावाने सोशल मीडियावर एक बोगस आॅर्डर धुमाकूळ घालत असतानाही प्रशासनाने पोलिसांकडे कोणतीही तक्रार दिली नाही. मनपाने तक्रार दिल्यास पोलीस सोशल मीडियावर आॅर्डर कोणी टाकली त्याचा शोध घेऊ शकतील. महापालिका प्रशासनाकडेच आजपर्यंत नागरिकांनी बोगस आॅर्डरसंदर्भात तक्रार केलेली नाही, हे विशेष.