जायकवाडीतून पाणी सोडल्याची अफवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 01:02 AM2017-09-20T01:02:45+5:302017-09-20T01:02:45+5:30
पैठण येथील जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आल्याची अफवा पसरल्याने गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पैठण येथील जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आल्याची अफवा पसरल्याने गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जायकवाडी प्रशासनास मंगळवारी दिवसभर लोकांनी फोन करून याबाबत विचारणा केली. त्यामुळे धरण प्रशासनाने सायंकाळी अधिकृत प्रेसनोट काढून पाणी सोडले नसल्याचा खुलासा केला आहे.
याबाबत धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले की, मंगळवारी प्रकल्पाचे एकही गेट उघडले नाही. ‘जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीत पाणी सोडले’ अशी बातमी सोशल मीडियावरून पसरविली जात आहे, ती पूर्णपणे खोटी आहे. अशा अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये.
धरणामध्ये मंगळवारी ६७.५३ टीएमसी म्हणजे ८८.१० टक्के जलसाठा असून, आवक ४३०० क्युसेक होती. नाशिककडून येणाºया पाण्याची आवक मंदावली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. पाणी सोडल्याच्या अफवांमुळे गोदाकाठच्या अनेक गावांत एकच गोंधळ उडाला. पुराच्या भीतीने गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. वाढता साठा पाहता जायकवाडीतून पाणी सोडण्यात येणार असल्याची मागच्या आठवड्यापासून जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या आठवड्यात लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) कार्यालयाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक बी. एस. स्वामी यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. ते म्हणाले, जायकवाडीतील पाणी पातळी ९४ टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.