मोफत घरकुल वाटपाच्या अफवेने महापालिकेत गर्दी; नागरिकांना उत्तरे देताना प्रशासनाची दमछाक

By मुजीब देवणीकर | Published: December 13, 2023 12:09 PM2023-12-13T12:09:00+5:302023-12-13T12:10:20+5:30

अनेकांनी तर मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांचा खरपूस समाचारही घेतला.

Rumors of free home distribution rush in the Chhatrapati Samabhajinagar municipal corporation; Tiredness of administration in giving answers to citizens | मोफत घरकुल वाटपाच्या अफवेने महापालिकेत गर्दी; नागरिकांना उत्तरे देताना प्रशासनाची दमछाक

मोफत घरकुल वाटपाच्या अफवेने महापालिकेत गर्दी; नागरिकांना उत्तरे देताना प्रशासनाची दमछाक

छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान आवास योजनेत नागरिकांना घरे देण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू आहे. मंगळवारी अचानक सोशल मीडियावर एक मेसेज झळकला. महापालिकेत मोफत घरांचे वाटप सुरू आहे. त्यामुळे मुख्यालयात नागरिकांनी एकच गर्दी करायला सुरुवात केली. असे कोणतेही घरकुल वाटप नाही, अशी उत्तरे देत प्रशासनाची मोठी दमछाक झाली.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पडेगाव, तीसगाव, हर्सूल, सुंदरवाडी येथे १२ हजार घरे बांधण्यात येणार आहेत. मनपाकडे ४२ हजार अर्ज आले आहेत. लाभार्थींची यादी अंतिम केली जाणार आहे. अर्जांची छाननी करून पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. मंगळवारी अचानक मनपात मोफत घरकुलांचे वाटप सुरू असल्याची अफवा पसरली. सकाळपासूनच मुख्यालयात लाभार्थ्यांनी गर्दी करायला सुरुवात केली. सुरक्षा रक्षक, अधिकारी, कर्मचारी नागरिकांना उत्तर देऊन कंटाळले. अशी कोणतीही प्रक्रिया सुरू नाही. नागरिकांचा यावर विश्वासही बसायला तयार नव्हता. 

एमआयएम पक्षाचे माजी गटनेते नासेर सिद्दीकी, माजी विरोधी पक्षनेता फेरोज खान, जमीर कादरी, आरेफ हुसेनी यांनी महापालिकेत येऊन टप्पा क्रमांक ३ इमारतीमध्ये टेबल लावला. नागरिकाला अशी कोणतीही योजना सुरू नसल्याचे ते सांगत होते. त्यामुळे नागरिक माघारी फिरत होते. अनेकांनी तर मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांचा खरपूस समाचारही घेतला. सायंकाळपर्यंत नागरिकांचा ओघ सुरूच होता. केंद्र शासनाने आपल्या कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संकल्प रथ शहरात फिरवण्यास सुरुवात केली. त्यामध्ये घरकुल योजनेचाही उल्लेख आहे. त्यामुळे मेसेज पसरविणाऱ्याचा गैरसमज झाला असेल, असे मनपातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले की, घरे बांधण्यासाठी संबंधित एजन्सीसोबत करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर लाभार्थी अंतिम केले जातील. या प्रक्रियेला आणखी एक महिना लागेल.

Web Title: Rumors of free home distribution rush in the Chhatrapati Samabhajinagar municipal corporation; Tiredness of administration in giving answers to citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.