उंडणगाव परिसरात अफवा वाघाची निघाले तरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:05 AM2021-06-10T04:05:17+5:302021-06-10T04:05:17+5:30
उंडणगाव : ‘पळा पळा वाघ आला, घराबाहेर पडू नका, जनावरे सुरक्षित बांधा. आम्हाला इकडे दिसला, कोणी म्हणे तिकडे दिसला,’ ...
उंडणगाव : ‘पळा पळा वाघ आला, घराबाहेर पडू नका, जनावरे सुरक्षित बांधा. आम्हाला इकडे दिसला, कोणी म्हणे तिकडे दिसला,’ अशी अफवा फोनाफोनीमुळे पसरल्याने उंडणगाव परिसरातील दोन वस्त्यांवरील नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. त्यानंतर, तो वाघ नसून तरस असल्याचे समोर आल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.
उंडणगाव गावाजवळच असलेल्या नंगेबाबावाडी व नागेश्वरवाडीत मंगळवारी रात्री वाघ आल्याची अफवा कोणीतरी पसरविली. फोनाफोनीमुळे सर्व रहिवाशांमध्ये धास्तीचे वातावरण पसरले. सर्वांनी सुरक्षितता म्हणून जनावरे गोठ्यात सुरक्षित बांधली. यानंतर, नाना धनवई, गणेश लांडगे, पंकज धनवई, गणेश धनवई, नामा गुऱ्हाळकर, तुकाराम सुरडकर, कृष्णा दांडगे आदी नागरिक हातात लाठ्या-काठ्या घेऊन बॅटरीच्या उजेडात वाघाचा शोध घेत होते. मात्र, वाघाचा काही पत्ता लागत नव्हता. तरीही भीतिपोटी नागरिकांनी रात्र जागून काढली. बुधवारी सकाळी तो वाघ नसून तरस असल्याची माहिती समोर आली. यानंतर, नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.
चौकट
नागरिकांनी घाबरून जाऊ नये
उंडणगाव परिसरात वाघ आल्याची अफवा पसरली होती. मात्र, तो वाघ नसून तडस असल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांनी घाबरू नये, हिंस्त्र वन्यप्राणी दिसल्यास लगेच वनविभागाशी संपर्क साधावा. घोळक्याने फिरावे, हातात बॅटरी व घुंगराची काठी असावी, असे अजिंठा वनविभागाचे वनरक्षक एस.एम. सागरे यांनी सांगितले.
फोटो कॅप्शन : उंडणगावजवळच असलेल्या नंगेबाबावाडी व नागेश्वर वाडी येथील नागरिक वाघाच्या भीतीने रात्रभर जागे होते.
090621\raghunath sawale_img-20210608-wa0039_1.jpg
उंडणगाव जवळच असलेल्या नंगेबाबा वाडी व नागेश्वर वाडी येथील नागरिक वाघाच्या भितीने रात्रभर जागे होते.