धावती कार पेटली; उरला केवळ सांगाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:51 AM2017-11-26T00:51:45+5:302017-11-26T00:51:52+5:30
अमरप्रीत चौकाकडून दर्गा चौकाकडे जाणारी इंडिका कार एका खाजगी रुग्णालयाजवळ अचानक जळून खाक झाली. यावेळी प्रसंगावधान राखून चालकाने कार रस्त्याशेजारी उभी करून उतरल्याने बालंबाल बचावला. ही घटना शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी सांगितले की, देवळाई परिसरातील म्हाडा कॉलनी येथील रहिवासी आनंद बोर्डे कार घेऊन क्र. (एमएच-२० एए २५६६) अमरप्रीत चौकाकडून बीड बायपासकडे जात होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अमरप्रीत चौकाकडून दर्गा चौकाकडे जाणारी इंडिका कार एका खाजगी रुग्णालयाजवळ अचानक जळून खाक झाली. यावेळी प्रसंगावधान राखून चालकाने कार रस्त्याशेजारी उभी करून उतरल्याने बालंबाल बचावला. ही घटना शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली.
पोलिसांनी सांगितले की, देवळाई परिसरातील म्हाडा कॉलनी येथील रहिवासी आनंद बोर्डे कार घेऊन क्र. (एमएच-२० एए २५६६) अमरप्रीत चौकाकडून बीड बायपासकडे जात होते.
शहानूरमियॉ दर्गा चौकाजवळील एका खाजगी रुग्णालयासमोर ते असताना अचानक कारमधून धूर निघत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी प्रसंगावधान राखून तातडीने कार रस्त्याच्या डाव्या बाजूला उभी केली आणि ते कारमधून उतरले. यानंतर काही क्षणात कारने पेट घेतला.
यावेळी प्रत्यक्षदर्शींनी कारची आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीने जास्त पेट घेतल्याने काही मिनिटांच्या कालावधीत संपूर्ण कार जळून खाक झाली. या आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर आणि उस्मानपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.