खराब वातावरणातही धावपट्टी दिसेल स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2016 12:16 AM2016-06-05T00:16:07+5:302016-06-05T00:44:03+5:30
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टीवरील अॅप्रोच लाईट यंत्रणा ४६० वरून ९०० मीटर करण्यासाठी प्राधिकरणाने प्रस्ताव सादर केला आहे.
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टीवरील अॅप्रोच लाईट यंत्रणा ४६० वरून ९०० मीटर करण्यासाठी प्राधिकरणाने प्रस्ताव सादर केला आहे. ही यंत्रणा ९०० मीटरपर्यंत वाढविल्याने खराब वातावरणातही धावपट्टी स्पष्टपणे दिसण्याची क्षमता वाढणार आहे. त्यामुळे विमानांची लँडिंग अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
विमानतळावरील धावपट्टी रात्रीच्या वेळी सहजरीत्या दिसण्यासाठी विशेष पॅटर्न असलेली अप्रोच लाईटची यंत्रणा असते. या यंत्रणेच्या मदतीने रात्रीच्या वेळी लँड होणाऱ्या विमानांना मदत होत असते. चिकलठाणा विमानतळावरील धावपट्टी (रनवे-२७) वरील सध्या अॅप्रोच लाईटची यंत्रणा ४६० मीटर आहे.
आजघडीला काही अडचणी येत नसल्या तरीही ही यंत्रणा ९०० मीटर पाहिजे. त्यामुळे त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाने घेतला आहे. ४६० वरून थेट ९०० मीटरपर्यंत वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.
ही यंत्रणा अशाप्रकारे वाढविताना सुखना नदीचा काही भाग यामध्ये येतो. त्यामुळे या ठिकाणी पिलर उभे करून त्यावर लाईट लावण्यासाठी मंजुरी मागण्यात आली आहे. ही यंत्रणा विमानतळासाठी आणि विमानांच्या उड्डाणासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे याबाबत विमानतळ प्राधिकरण प्राधान्याने प्रयत्न करीत आहे.
अॅप्रोच लाईट यंत्रणा महत्त्वाची असल्याने ती वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय यांनी सांगितले.