ऑक्सिजन पातळी कमी झाल्यावर ग्रामीण रुग्ण सरळ शहरात ‘रेफर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:02 AM2021-03-13T04:02:12+5:302021-03-13T04:02:12+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातून ऑक्सिजन पातळी कमी होणाऱ्या कोरोना रुग्णांना सरळ शहरात पाठविले जात आहे. असे रुग्ण घाटीत ...
औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातून ऑक्सिजन पातळी कमी होणाऱ्या कोरोना रुग्णांना सरळ शहरात पाठविले जात आहे. असे रुग्ण घाटीत येण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा आणि उपचार सुविधांविषयी प्रश्न उपस्थित होत आहे. केंद्रीय पथकानेही ही बाब गंभीरतेने घेत यासंदर्भात सुधारणा करण्याची सूचना केली आहे.
घाटीत बुधवारी झालेल्या बैठकीत केंद्रीय पथकाने शहरातील इतर रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांतून ऑक्सिजन पातळी अगदी कमी असलेले रुग्ण संदर्भीत होत असल्याबाबत काळजी व्यक्त केली. ज्या रुग्णालयांमधून हे रुग्ण संदर्भीत केले जातात, त्या रुग्णालयांना याबाबत अभिप्राय देऊन अधिक कमी ऑक्सिजन पातळीचे रुग्ण का संदर्भीत करण्यात येतात, याबाबत सखोल विचार करण्याची आवश्यकता असल्याचे पथकाने सांगितल्याची माहिती घाटी प्रशासनातर्फे देण्यात आली.
कोरोनाग्रस्त रुग्णाची प्रकृती गंभीर झाली की, ग्रामीण भागांतून सरळ घाटीत रुग्णांना रेफर केले जात आहे. घाटीत मृत्यू पावलेल्या एकूण रुग्णांत बहुतांश रुग्ण 'रेफर' केलेले आहेत. ग्रामीण भागातील गंभीर रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. अशांना घाटीत पाठविले जाते. ऑक्सिजन सिलिंडर लावून रुग्णांना अनेक कि.मी.चा प्रवास करीत शहर गाठावे लागत आहे. त्यामुळे उपचाराला उशीर होऊन रुग्णांचा जीव धोक्यात येत आहे.
गंभीर रुग्णांचा वाढता आलेख
घाटीत दाखल गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याठिकाणी गुरुवारी गंभीर रुग्णांची संख्या १७७ झाली. तर १५४ रुग्णांची प्रकृती सामान्य आहे. याठिकाणी सामान्य रुग्णांपेक्षा गंभीर रुग्णच अधिक दाखल होत असून, उपचारासाठी डाॅक्टर, परिचारिका, कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत.