गुन्ह्यांचा छडा लावण्यात ग्रामीण पोलीस अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:04 AM2021-09-19T04:04:47+5:302021-09-19T04:04:47+5:30
राम शिनगारे औरंगाबाद : जानेवारी ते डिसेंबर, २०२० या कालावधीत औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी नोंदविलेल्या ७ हजार ४२९ गुन्ह्यांपैकी तब्बल ...
राम शिनगारे
औरंगाबाद : जानेवारी ते डिसेंबर, २०२० या कालावधीत औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी नोंदविलेल्या ७ हजार ४२९ गुन्ह्यांपैकी तब्बल ६ हजार २०८ गुन्ह्यांचा तपास पूर्ण केला असून, केवळ १,२२१ गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे. एकूण गुन्ह्यांच्या तपासाची टक्केवारी ८३.५७ टक्के असून, प्रलंबित तपासाची टक्केवारी १६.४३ टक्के एवढी आहे. याशिवाय खून, जबरी चोरी, दरोडा, घरफोडी आदी गुन्हे उघड होण्याचे प्रमाण ५७.५६ टक्के असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
राज्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस युनिटची घोषणा नुकतीच राज्याच्या पोलीस महासंचालनालयाने केली. यामध्ये अ, ब आणि क अशी श्रेणी देण्यात आली आहे. यातील ‘अ’ श्रेणीत बेस्ट पुलीस युनिटचे अवॉर्ड पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण आणि पोलीस अधीक्षक रायगड यांनी पटकावले आहे. याच कॅटेगिरीत दोष सिद्धीत पोलीस आयुक्त नवी मुंबई, तंत्रज्ञानात आणि कम्युनिटी पुलिसिंग अशा दोन कॅटेगिरीत गडचिरोली पोलीस अधीक्षकांना बेस्ट अवॉर्ड मिळाले. वेल्फेअरमध्ये वाशिमने बाजी मारली.
पोलीस महासंचालनालयाने एकूण ४४ पॉइंटच्या आधारे हे मूल्यमापन केले आहे. यामध्ये गुन्ह्याच्या तपासापासून ते पोलिसांचे वेल्फेअर, प्रशासन, वर्तवणुकीचा समावेश आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीमध्ये २०२० मध्ये ३४ खुनांच्या घटना घडल्या. त्यापैकी ३२ घटनेतील आरोपींना पकडले. जबरी चोरीच्या १३ गुन्ह्यांतील सर्वच आरोपींना पकडले. दरोड्याच्या गुन्ह्यांत २३ पैकी ११ उघडकीस आणले, घरफोडीच्या ११० घटनांपैकी ३७ घटनांतील गुन्हेगार शोधण्यात यश आले आहे. भारतीय दंड संहिता कायद्यान्वये वर्षभरात एकूण ३ हजार ४६६ गुन्ह्याची नोंद झाली. त्यापैकी ९८० गुन्ह्यांचा तपास पूर्ण झालेला नाही, तसेच ‘आयपीसी’शिवाय इतर कायद्यान्वये दाखल ३ हजार ९६३ गुन्ह्यांतील केवळ २४१ गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. उर्वरित सर्व गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला आहे. वर्षभरात सायबरच्या ९५ गुन्ह्यांच्या तक्रारीची नोंद झाली होती. त्या सर्व तक्रारींची चौकशी पूर्ण केली असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
चौकट,
२४ महिला अत्याचाराचा तपास ६० दिवसांत पूर्ण
औरंगाबाद ग्रामीण पोलीस हद्दीत २०२० या वर्षभरामध्ये एकूण ४९ बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद झालेली होती. त्यापैकी न्यायालयामध्ये २४ प्रकरणांत अंतिम आरोपपत्र ६० दिवसांच्या आत सादर करण्यात आले आहे, तसेच १८ वर्षांखालील १३५ जणांचे अपहरण (मिसिंग) झाले. त्यापैकी १२२ जणांचा शोध लावण्यात यश मिळाले. १३ जणांचा शोध लागला नाही. १८ वर्षांवरील ७२८ जणांचे अपहरण झाले. त्यापैकी ६१७ जणांचा शोध लागला. ११२ जणांचा शोध लागलेला नाही. या आकडेवारीत २०१९ मधील शोध न लागलेल्या व्यक्तींचाही समावेश आहे.