ग्रामीण तहसीलदार ज्योती पवार यांचे पुन्हा निलंबन, ४० दिवसात दोनदा केली कारवाई
By विकास राऊत | Published: August 25, 2023 11:56 AM2023-08-25T11:56:17+5:302023-08-25T11:56:24+5:30
तहसीलदार ज्योती पवार यांचे पहिले निलंबन मॅटमुळे झाले होते रद्द
छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामीण तहसीलदार ज्याेती पवार यांना शासनाने गुरूवारी दुसऱ्यांदा निलंबित केले.
फुलंब्री तालुक्यातील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या सावंगी येथील १४० एकर जमिनीपैकी २० एकर जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आली. उर्वरित ८० ते १२० एकर जमिनीतून महामार्गाच्या कामासाठी मुरूम उपसण्याच्या प्रकरणात ग्रामीण तहसीलदारांनी कारवाई न केल्याचा ठपका ठेवत पवार यांना ४० दिवसांत दुसऱ्यांदा निलंबित केले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, विभागीय आणि जिल्हा प्रशासनाकडेही याबाबत कागदोपत्री जुळवाजुळव सुरू आहे. असे असतानाच गुरूवारी सायंकाळी पवार यांचे निलंबन आदेश आले.
पवार यांनी १ मार्च २०२१ रोजी ग्रामीण तहसीलदार पदाचा पदभार घेतला. तत्पूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये उत्खननप्रकरणी लक्षवेधी झाली होती. जुलै २०२३ मध्ये पवार यांचे निलंबन झाल्यानंतर त्यांनी मॅटमधून स्थगिती मिळवली होती. दरम्यान, २०१६ पासून आजवर सात तहसीलदार बदलून गेले आहेत. सर्वांबाबत शासनाची काय भूमिका आहे, असा प्रश्न आहे. या प्रकरणी तहसीलदार पवार यांच्याशी संपर्क केला असता, त्या म्हणाल्या, गौण खनिज उत्खनन प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.