जाधववाडीत भाजीपाला खरेदीसाठी झुंबड
By | Published: December 2, 2020 04:06 AM2020-12-02T04:06:13+5:302020-12-02T04:06:13+5:30
औरंगाबाद : शेतकरी, विक्रेते व ग्राहकांनी रविवारी सकाळी जाधववाडीतील पालेभाज्याच्या अडत बाजारात प्रचंड गर्दी केली. कहर म्हणजे ९० टक्के ...
औरंगाबाद : शेतकरी, विक्रेते व ग्राहकांनी रविवारी सकाळी जाधववाडीतील पालेभाज्याच्या अडत बाजारात प्रचंड गर्दी केली. कहर म्हणजे ९० टक्के लोकांनी मास्क लावलेले नव्हते. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुडविला गेला. कृषी उत्पन्न बाजार समितीच नव्हे, तर जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने ही गर्दी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आमंत्रण ठरत आहे.
रविवारी पहाटे ५ वाजेपासून अडत बाजारात प्रचंड गर्दी उसळली. कोणी शिंकत होते, कोणी खोकत होते; पण कोणालाही याची पर्वा नव्हती. स्वस्तात मिळते म्हणून ग्राहकही जीव धोक्यात टाकून या गर्दीचा एक भाग बनले. शेतकरी, अडत व्यापारी, त्यांच्याकडील कर्मचारी, किरकोळ विक्रेते यापैकी कोणीच मास्क लावले नव्हते. ग्राहकांमध्ये महिलाच मास्क लावलेल्या दिसून आल्या. ९० टक्के नागरिक व विक्रेते विनामास्क दिसले. ‘मास्क लावा’ असे लाऊडस्पीकरवर सांगण्यात येते होते. कोणीच नियमाचे पालन करीत नव्हते.
बाजार समितीचा हलगर्जीपणा
कृषी उत्पन्न बाजार समितीही गर्दी रोखण्यासाठी काही करताना दिसून येत नाही. जणू या प्रचंड गर्दीसमोर प्रशासनाने हात टेकले असेच वाटत होते. दुपारी ११ वाजेपर्यंत अशीच गर्दी कायम होती. ६ तासांत २० ते २५ हजार लोक या अडत बाजारात येऊन गेले. शहरात कोरोनाची दुसरी लाट आली तर याच जाधववाडीतून येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
चौकट
मास्क तोंडावर लावले
सकाळी ९ ते ९.१५ वाजेदरम्यान मनपाचे पथक आले, अशी बातमी पसरताच अडत दुकानदारांनी खिशातून मास्क काढून तोंडाला लावले.
चौकट
बाजार समितीची जबाबदारी
अडत बाजारात होणारी गर्दी रोखणे व नियमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. सुरक्षा रक्षकही नेमण्यात आले नाहीत. पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता आहे.
इसा खान, अध्यक्ष, फळ, भाजीपाला अडत व्यापारी संघटना.