एस. टी. च्या कर्मचाऱ्यांमध्ये दहशत
By Admin | Published: September 8, 2015 12:18 AM2015-09-08T00:18:48+5:302015-09-08T00:37:22+5:30
औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकात रविवारी रात्री चौकशी कक्ष आणि प्रवासी मित्र कक्षाच्या काचा फोडल्याच्या घटनेनंतर एस. टी. महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे
औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकात रविवारी रात्री चौकशी कक्ष आणि प्रवासी मित्र कक्षाच्या काचा फोडल्याच्या घटनेनंतर एस. टी. महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सोमवारी पोलीस आयुक्तांकडे धाव घेऊन अवैध प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एजंट आणि विनापरवाना खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.
पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आल्यानंतर पोलीस अधिकारी आणि मध्यवर्ती बसस्थानकातील अधिकारी-कर्मचारी यांच्यात बैठक झाली. यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर, मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक सी. के. सोळसे, स्थानकप्रमुख जेवळीकर, वाहतूक निरीक्षक संतोष नजन, प्रेमानंद कर्णे, पंढरीनाथ काळे, मच्छिंद्र बनकर, सुरेश जाधव आदींची उपस्थिती होती.
मध्यवर्ती बसस्थानकातील पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी एजंटांवर कारवाई करण्याक डे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या चौकीतील कर्मचारी दर महिन्याला बदलण्यात यावेत, अशी मागणी एस. टी. च्या अधिकाऱ्यांनी केली. एजंट, अवैध विक्रेत्यांवर नियंत्रण आणण्यासाठी एस.टी.तर्फे विशेष पथक स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांचे सहकार्य मिळणार आहे.
वाहने, टपऱ्यांवर कारवाई
अविनाश आघाव यांनी बसस्थानक परिसराची पाहणी केली. यावेळी बसस्थानकासमोरील काही टपऱ्यांवर कारवाई करून त्या जप्त करण्यात आल्या. बसस्थानकासमोर ठिकठिकाणी उभ्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली.
एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यामुळेच आपली चोरी उघडकीस झाल्याचे गृृहीत धरून एका जणाने अधिकाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी एस.टी. बसस्थानकावरील नियंत्रण कक्षाच्या काचा फोडल्या.
६ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आमेर नावाच्या व्यक्तीने मध्यवर्ती बसस्थानकावरील नियंत्रण कक्षाच्या काचा फोडल्या. आमेर हा तेथे खाजगी वाहनांना प्रवासी पुरवितो. त्यानेच एका महिलेची पर्स चोरल्याचे समोर आले. त्यामुळे त्या महिलेच्या नातेवाईकांनी त्यास फोन करून बोलावून घेतले. तेव्हा त्याने पर्समधील केवळ एटीएम कार्ड त्यांना परत केले. त्यानंतर त्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी घेऊन जात असताना तो पळून गेला आणि रात्री उशिरा बसस्थानकात आला. एस.टी. अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरूनच आपली चोर म्हणून ओळख उघड झाल्याचा राग त्याच्या मनात होता. या रागातूनच त्याने ही तोडफोड केली.