सचिन तेंडुलकर ४५ मिनिटे औरंगाबाद विमानतळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:34 AM2018-05-27T00:34:36+5:302018-05-27T00:36:12+5:30
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर शनिवारी (दि.२६) मुंबईहून चार्टर प्लेनने एका कार्यक्रमासाठी नागपूरला रवाना झाला होता; परंतु नागपूर येथील खराब हवामानामुळे हे विमान रात्री ८ वा. औरंगाबादेत चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. इंधन भरल्यानंतर रात्री ८.४५ वाजता विमानाने सचिन पुन्हा मुंबईला परतला. यानिमित्ताने सचिन औरंगाबादेत दाखल झाला; परंतु केवळ ४५ मिनिटांसाठीच.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर शनिवारी (दि.२६) मुंबईहून चार्टर प्लेनने एका कार्यक्रमासाठी नागपूरला रवाना झाला होता; परंतु नागपूर येथील खराब हवामानामुळे हे विमान रात्री ८ वा. औरंगाबादेत चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. इंधन भरल्यानंतर रात्री ८.४५ वाजता विमानाने सचिन पुन्हा मुंबईला परतला. यानिमित्ताने सचिन औरंगाबादेत दाखल झाला; परंतु केवळ ४५ मिनिटांसाठीच.
नागपूर येथे खासदार क्रीडा महोत्सवाचा शनिवारी सायंकाळी समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास सचिन तेंडुलकरची उपस्थिती हा आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. त्यासाठी सचिनने मुंबई येथून सायंकाळी चार्टर प्लेनने नागपूरसाठी उड्डाण घेतले; परंतु नागपूर येथील वातावरण खराब झाले होते. त्यामुळे नागपूरजवळ पोहोचलेले सचिनचे विमान औरंगाबादला वळविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रात्री ८ वाजेच्या सुमारास विमान चिकलठाणा विमानतळावर दाखल झाले. लाखो लोकांच्या गळ्यातील ताईत क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर विमानतळावर आल्याची माहिती विमानतळावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांबरोबर प्रवाशांपर्यंत पोहोचली. सर्वांनी सचिनची भेट घेण्यासाठी प्रयत्न केला.
विमानतळावर दाखल झाल्यानंतर काही वेळेनंतर सचिन विमानाच्या बाहेर पडला आणि क्रिकेट विश्वातील देव मानल्या जाणाºया मास्टरब्लास्टरचे सर्वांना दर्शन घडले. अंगात ग्रे रंगाचा शर्ट घातलेल्या सचिनने लक्ष वेधून घेतले.
विमानतळावरील अधिकारी-कर्मचाºयांबरोबर सचिनने संवाद साधला. त्यांच्यासोबत फोटोशेसनही केले. यादरम्यान अधूनमधून सचिन मोबाईलवरही संवाद साधत होता. जवळपास १५ ते २० मिनिटे तो विमानाच्या बाहेर होता. सचिन विमानतळावर असल्याची माहिती मिळाल्याने काहींनी लहान मुलांसह विमानतळावर धाव घेतली होती; परंतु सचिन विमानतळाच्या आतमध्येच असल्याने त्यांची निराशा झाली.
विमान औरंगाबादला वळविण्यात आल्याने विमानातील इंधन कमी झाले होते. त्यामुळे विमानतळावर चार्टर प्लेनमध्ये इंधन भरण्यात आले. जवळपास ४५ मिनिटे थांबल्यानंतर सचिन मुंबईसाठी रवाना झाला. रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास विमानाने मुंबईसाठी उड्डाण घेतल्याची माहिती विमानतळाच्या अधिकाºयांनी दिली.