‘एलएचबी’ डब्यांसह सचखंड एक्स्प्रेस स्थानकात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 04:08 PM2018-09-28T16:08:25+5:302018-09-28T16:15:00+5:30
पारंपरिक डब्यांच्या तुलनेत एलएचबी डब्यांमध्ये स्लीपर क्लासमध्ये ८, ए.सी. थ्री टायरमध्ये ८ आणि एसी टू टायर मध्ये ४ बर्थ अधिक असतात.
औरंगाबाद : नांदेड येथून अमृतसरला जाणारी सचखंड एक्स्प्रेस (१२७१५) ‘एलएचबी’ अर्थात लिंके हॉफमन बोस्च या जर्मन कंपनीने विकसित केलेले २२ डबे घेऊन औरंगाबाद स्थानकात गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास दाखल झाली. या एक्स्प्रेसचे लोहमार्ग पोलीस, प्रवासी सेनेसह रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्वागत केले.
पारंपरिक डब्यांच्या तुलनेत एलएचबी डब्यांमध्ये स्लीपर क्लासमध्ये ८, ए.सी. थ्री टायरमध्ये ८ आणि एसी टू टायर मध्ये ४ बर्थ अधिक असतात. साधारण डब्यापेक्षा एलएचबी पद्धतीचे डबे अधिक आरामदायी आणि सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघात झाल्यास या पद्धतीचे डबे एकमेकांवर चढत नाहीत. त्यामुळे किमान हानी होते. चाकांना डिस्क ब्रेक असल्यामुळे अधिक सुरक्षितता येते. तसेच प्रसाधनगृह आधुनिक आणि पर्यावरणपूरक असून, या डब्यांची निर्मिती भारतीय रेल्वेमध्ये करण्यात आली आहे.
आधुनिक पद्धतीने तयार केलेले एलएचबी डबे घेऊन गुरुवारी सचखंड एक्स्प्रेस औरंगाबाद स्थानकात दाखल झाली. यावेळी स्थानक व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे, लोहमार्ग पोलीस निरीक्षक दिलीप साबळे, रेल्वे पोलीस निरीक्षक अरविंदकुमार शर्मा, प्रवासी रेल्वे सेनेचे संतोष सोमाणी यांच्यासह प्रवासी उपस्थित होते.
प्रवाशांची गैरसोय दूर होणार
जर्मन तंत्रज्ञानाच्या आधारे हे डबे विकसित करण्यात आले आहेत. यामध्ये आसन क्षमता वाढल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होऊन रेल्वेचेही उत्पन्न वाढणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक बाबींचा यात सामवेश करण्यात आलेला आहे.
- लक्ष्मीकांत जाखडे, रेल्वेस्थानक व्यवस्थापक, औरंगाबाद
एलएचबी बोगीचे वैशिष्ट्य
- जास्त बर्थ : स्लीपर क्लासमध्ये- ८, ए.सी. थ्री टायरमध्ये-८ आणि ए.सी. टू टायरमध्ये ४ बर्थ जास्त.
- एलएचबी कोचेस अधिक आरामदायक.
- अधिक सुरक्षित बोगी. अपघाताच्या वेळी कोचेस एकमेकांवर चढत नाहीत. त्यामुळे हानी कमी होते.
- बोगींना डिस्क ब्रेक. त्यामुळे सुरक्षितता वाढते.
- बोगींमध्ये प्रसाधनेदेखील आधुनिक स्वरुपाची.
- प्रत्येक सीटसाठी मोबाईल चार्जर, हँगर, अग्निसुरक्षा कीट.
- प्रवासी क्षमताही आता १३४ ने वाढली.