विद्यार्थी-शिक्षकांच्या मिलापातून मंदिरात ज्ञानदानाचा यज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:04 AM2021-06-10T04:04:12+5:302021-06-10T04:04:12+5:30
शाळा आपल्या दारी : न्यू हायस्कूल करमाडचा अभिनव उपक्रम, ३ गावांत जाऊन शिक्षकांची शिकवण्याला सुरुवात -- औरंगाबाद : ...
शाळा आपल्या दारी : न्यू हायस्कूल करमाडचा अभिनव उपक्रम, ३ गावांत जाऊन शिक्षकांची शिकवण्याला सुरुवात
--
औरंगाबाद : करमाडपासून ७ किलोमीटवर डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या नागोण्याची वाडीमधील मारुतीच्या पारावर बुधवारी सकाळी विद्यार्थी इंग्रजीचे धडे गिरवत होते, तर हिवरा येथे हनुमान मंदिरात गणिताचे तर विठ्ठल-रुख्मिनी मंदिरात मराठी व्याकरणाचे वर्ग सुरू होते. कोरोनामुळे विद्यार्थी शिक्षण, शिक्षक आणि शाळेपासून दुरावत आहेत. हे ओळखून करमाडच्या न्यू हायस्कूलने ‘शाळा आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केल्याने मुलांच्या हाती वह्या-पुस्तके आली आहे. शिक्षणासाठी पायपीट करून शाळा गाठणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गावातच शिक्षक आल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित तर कित्येक महिन्यांनी फळा, खडू, विद्यार्थ्यांच्या सानिध्यात आलेल्या शिक्षकांतही अभूतपूर्व उत्साह संचारला आहे. त्यात गावकरीही हवे नको याची शिक्षकांकडे आस्थेवाईकपणे विचारपूस करत होते. शिक्षक विद्यार्थ्यांच्या मिलापातून तीन गावांच्या मंदिरात ज्ञानदानाचा यज्ञ पेटतो आहे.
राज्यभरात गेल्या वर्षभर ऑनलाइन, काही काळ ऑफलाइन शिक्षण, त्यानंतर शाळेला लागलेल्या उन्हाळी सुट्या सुरू आहेत. करमाडच्या न्यू हायस्कूलच्या ‘शाळा आपल्या दारी’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाने आदर्श निर्माण केला आहे. शाळेत १२ खेड्यांतील १८०० विद्यार्थ्यांचा पट, ही शाळा कधी विद्यार्थ्यांची विमान सफर, तर गणिताची प्रयोगशाळा, अशा या ना त्या नवनव्या उपक्रमांतून चर्चेत असते; पण गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे हे सर्व ठप्प झाले होते. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या या शाळेच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली. ५१ व्या वर्षात विद्यार्थी शिक्षकांचे दुरावलेले नाते पुन्हा घट्ट करण्यासाठी शालेय समितीचे अध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी पुढाकार घेतला. शाळा भरवता येत नाही, विद्यार्थ्यांना शाळेत येता येत नाही, अशा गावागावात जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याची कल्पना त्यांनी मांडली.
शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षकांनीही होकार भरला. तत्काळ १२ पैकी सोमवारपासून पहिल्या ३ गावांत उन्हाळी सुट्यांतच हा उपक्रम सुरू झाला. सुरुवातीला पाचवी ते दहावीच्या वर्गात इंग्रजी, गणित, विज्ञान या तीन विषयांना प्राध्यान्य दिल्याचे शिक्षक सुदाम घावडे म्हणाले. या उपक्रमात शिक्षक प्रशांत पठाडे, राजेश पडवळे, वनश्रू मंडपमाळवी, विठ्ठल पवार, स्वाती बंद, मंजूषा गव्हाणे, रामू राजपूत, अशोक भोसले सहभागी आहेत, तर शालेय समितीचे सदस्य रामूकाका शेळके, प्रसाद शेळके यांच्यासह गावकरी, सदस्य सहकार्य करीत आहेत.
---
पुढील काही महिने विद्यार्थ्यांना ऑनलाइनच शिकावे लागेल, असे दिसते. गेले वर्षभर मुले प्रत्यक्ष वर्गात शिकू शकली नाही. काही दिवस वर्ग भरले अन् पुन्हा बंद पडले; परंतु ऑनलाइन शिक्षण सर्वांना घेणे शक्य नसल्याचे जाणवले. प्रत्येकापर्यंत शिक्षण पोहचावे यासाठी शिक्षकांच्या मदतीने गावागावात जाऊन शिकवण्यासाठी हा उपक्रम सुरू केला. त्याला पालकांसह शिक्षक, विद्यार्थ्यांतूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
-अभिजीत देशमुख, अध्यक्ष शालेय समिती
---
--
ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांचा निरुत्साह जाणवत होता. या उपक्रमात गावात प्रत्यक्ष शिक्षणाला सुरुवात केल्यावर विद्यार्थ्यांची अध्ययन गती तर वाढली शिवाय उत्साह वाढल्याचे उपस्थितीवरून दिसत आहे. पालकांकडूनही सहकार्य मिळत आहे. हा उपक्रम आम्हालाही विद्यार्थ्यांशी जोडणारा आहे.
-प्रदीप कोळेकर, शिक्षक
--
संस्थेचे सचिव आ. सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वात शालेय समितीचे अध्यक्ष अभिजीत देशमुख यांच्या संकल्पनेतून गेल्या तीन दिवसांपासून शाळा आपल्या दारी उपक्रम सुरू केला. शिक्षणाची गोडी लावताना प्रत्यक्ष शिक्षणाची गरज ओळखून या उपक्रमात सर्व शिक्षक उत्स्फूर्त सहभागी होऊन सोमवारपासून नागोण्याची वाडी, करमाड, हिवरा येथे मंदिरांच्या सभामंडपात वर्ग सुरू केले.
-उज्ज्वला पवार, मुख्याध्यापक, न्यू हायस्कूल, करमाड
---
कोरोनाचा प्रकोप आता लहान मुलांत होण्याच्या भाकितावर चर्चा घडत असताना विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबद्दल मनात भीती होती. गाव कोरोनामुक्त आहे. शिक्षक तपासणी करून गावात आले. मंदिराच्या सभामंडपात वर्ग भरवले. त्यामुळे सहा महिन्यांनंतर मुलांच्या हाती वही-पुस्तक आले. हे पाहून आनंद वाटतोय.
-ज्ञानेश्वर पोफळे, पालक, हिवरा
---
दहावीचे वर्ष सुरू झाले. गावात मोबाइलला रेंज मिळत नाही. त्यामुळे ऑनलाइन शिकण्यात अडथळे आले. त्यात ७ किलोमीटरवर शाळा आहे. सर गावातच शिकवायला आल्याने जाण्या-येण्याचा त्रास कमी झाला. शिवाय कोरोना संक्रमनाची भीती राहिली नाही. शिकण्याचा आनंदही अनुभवतोय.
-संजना बहुरे, इयत्ता दहावी, विद्यार्थिनी, नागोण्याची वाडी
---
गावात सातवीपर्यंत शाळा आहे. पुढे करमाडला शिकायला जावे लागते. येण्या-जाण्याचे साधन नाही, तर गावात ऑनलाइन शिक्षणाला तांत्रिक अडथळे होते. त्यातील मध्यम मार्ग शाळेने काढला. दहावीच्या वर्षाचे टेन्शन आले होते. आता शाळा आपल्या दारी उपक्रमामुळे प्रत्यक्ष शिक्षणाचा अनुभव घेतोय.
-जितेंद्र शिसोदे, इयत्ता दहावी, विद्यार्थी, नागोण्याची वाडी