मजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला; पूर्णा नदीपात्रात बहिणीला वाचवताना भाऊही बुडाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 07:55 PM2022-05-12T19:55:04+5:302022-05-12T19:57:01+5:30
बहीण-भावाच्या चपला नदीकाठावर दिसत असताना दोघेही सापडत नसल्याने आई वडिलांना शोधाशोध सुरू केली.
सेनगाव (जि. हिंगोली) : तालुक्यातील बोडखा येथे पूर्णा नदीचे पात्र ओलांडून येत असताना बहीण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना १२ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. तासाभराच्या शोधानंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
तालुक्यातील बोडखा शिवारातील पूर्णा नदीच्या शिवारात गुलाब राठोड हे आपली पत्नी व मुलगा गोपाल राठोड (वय १०) तर मुलगी विशाखा राठोड (वय ७) यांना सोबत घेऊन उन्हाळी भुईमूग काढणीसाठी नदीपात्राच्या पलीकडील भागात मजुरीसाठी गेले होते. नदीकाठावर असलेल्या शेतात या चिमुकल्यांचे आई-वडील भुईमूग काढणीमध्ये मग्न होते. यावेळी यातील मुलगा गोपाल राठोड नदीपात्राच्या अलीकडच्या भागात होता. पलीकडच्या भागातून लहान बहीण विशाखा येत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडत होती. यावेळी तिला वाचविण्यासाठी भाऊ धावून गेला. पण, दोघेही या नदीपात्राच्या पाण्यात बुडाले.
बहीण-भावाच्या चपला नदीकाठावर दिसत असताना दोघेही सापडत नसल्याने शोधाशोध सुरू केली. त्यानंतर नदीच्या काठावर या दोघांचे मृतदेह आढळले. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे बोडखा गावावर शोककळा पसरली आहे. गुलाब राठोड यांना ही दोनच अपत्ये होती.