दुर्दैवी! सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील भक्ती वाघिणीच्या दुसऱ्या बछड्याचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 12:30 PM2021-04-16T12:30:35+5:302021-04-16T13:43:00+5:30
The death of Bhakti tigers's calf महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात वीर पांढरा वाघ आणि भक्ती पिवळी वाघीण या जोडीपासून ३ एप्रिल रोजी भक्तीने दोन गोंडस पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला होता.
औरंगाबाद : महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील भक्ती वाघिणीने दिलेल्या दोनपैकी एका बछड्याचा चार दिवसांपूर्वीच मृत्यू झाला. भक्तीत मातृत्वाची भावना नसल्याने ती दुसऱ्या बछड्यालाही दूध पाजत नव्हती. त्यामुळे या बछड्याची प्रकृती दोन दिवसांपासून अधिकच खालावली होती. दरम्यान, बुधवारी रात्री साडेदहा वाजता या बछड्यानेही अखेरचा श्वास घेतला. गुरूवारी सकाळी बछड्याचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.
महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात वीर पांढरा वाघ आणि भक्ती पिवळी वाघीण या जोडीपासून ३ एप्रिल रोजी भक्तीने दोन गोंडस पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला होता. सिद्धार्थ उद्यानातील या भक्ती वाघिणीची बछडे देण्याची ही पहिलीच वेळ होती. बछड्यांना जन्म दिल्यानंतर तिच्यात मातृत्वाची भावना दिसून आली नाही. त्यामुळे भक्ती वाघीण ही बछड्याची काळजी घेत नव्हती. तसेच दूधही पाजत नव्हती. त्यामुळे बछड्यांना ठराविक अंतराने बकरीचे दूध पाजण्यात येत होते. दरम्यान ६ एप्रिलच्या रात्री भक्ती वाघीण पिंजऱ्यात फिरत असताना एका बछड्यावर तिचा पाय पडला होता. त्यानंतर त्या बछड्याने दूध पिणे बंद केले. १० एप्रिल रोजी या बछड्याचा मृत्यू झाला.
त्यानंतर दुसऱ्या बछड्याचीही तब्येत दोन दिवसांपासून अधिकच नाजूक झाली. या स्थितीतही प्राणिसंग्रहालय प्रशासन खडकेश्वर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून या बछड्यास जगवण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र बुधवारी रात्री साडेदहा वाजता या बछड्यानेही जगाचा निरोप घेतला. गुरूवारी सकाळी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अश्विनी राजेंद्र यांनी बछड्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. तांबे, वनपरिमंडळ अधिकारी ए.डी. तांगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बछड्याचे अंत्यसंस्कार करून पंचनामा करण्यात आला.