दुखद ! सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील भक्ती वाघिणीच्या एका बछड्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 07:24 PM2021-04-10T19:24:00+5:302021-04-10T19:26:58+5:30
बछडयावर प्राणी संग्रहालयाचे पशुवैद्यक डॉ. निती सिंग यांच्यामार्फत उपचार करण्यात आले. परंतु, बछड्याने उपचाराला प्रतिसाद न दिल्याने शनिवारी सकाळी आठ वाजता बछड्याचा मृत्यू झाला.
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणी संग्रहालयातील पिवळी वाघिण भक्तीने ३ एप्रिल रोजी दोन पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला होता. त्यापैकी एका बछड्याचा शनिवारी सकाळी आठ वाजता मृत्यू झाला.
सिद्धार्थ उद्यानातील भक्ती वाघिणीने पहिल्यांदाच बछड्यांना जन्म दिला होता. त्यानंतर भक्ती वाघिणीमध्ये मातृत्वाची भावना दिसून आली नाही. त्यामुळे भक्ती पिलांची काळजी घेत नव्हती तसेच दूधही पाजत नव्हती. त्यामुळे बछड्यांना ठराविक अंतराने बकरीचे दूध पाजण्यात येत होते. दरम्यान, ६ एप्रिल रोजी रात्री भक्ती वाघीण पिंजऱ्यामध्ये फिरत असताना एका बछड्यावर तिचा पाय पडला होता, त्यामुळे बछड्याला वेदना झाल्या. त्यानंतर बछडा दूध कमी पीत होता. नंतर हळूहळू बछड्याने दूध पिणे बंद केले. दोन्ही बछड्यांना आईपासून वेगळे करून दुसऱ्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते.
यापूर्वी प्राणिसंग्रहालयात एक नर व दोन मादी असे एकूण तीन पांढरे वाघ होतेhttps://t.co/1bzsJzaLjk
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) April 3, 2021
पाय पडलेल्या बछडयावर प्राणी संग्रहालयाचे पशुवैद्यक डॉ. निती सिंग यांच्यामार्फत उपचार करण्यात आले. परंतु, बछड्याने उपचाराला प्रतिसाद न दिल्याने शनिवारी सकाळी आठ वाजता बछड्याचा मृत्यू झाला. या बछड्याचे शवविच्छेदन डॉ. अश्विनी राजेंद्र यांनी केले. दरम्यान, मृत्यू झालेल्या बछड्याच्या अंत्यसंस्काराला वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. तांबे, वन परिमंडळ अधिकारी ए. डी. तांगडे उपस्थित होते. त्यांच्या समक्ष मृत बछड्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार बछड्याच्या शरिरात रक्तस्त्राव झाल्याने बछड्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. भक्ती वाघिणीचा दुसरा बछडा सध्या सुरक्षित आहे.