मेहदीला पळवून नेण्याच्या कटातील सद्दाम अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:53 AM2018-09-14T00:53:13+5:302018-09-14T00:53:27+5:30
कुख्यात सुपारी किलरला पोलिसांच्या ताब्यातून पळवून नेण्याच्या कटात सहभागी आरोपीला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी दुपारी कटकटगेट परिसरात अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कुख्यात सुपारी किलरला पोलिसांच्या ताब्यातून पळवून नेण्याच्या कटात सहभागी आरोपीला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी दुपारी कटकटगेट परिसरात अटक केली.
शेख सद्दाम शेख इमाम (२८, रा. युनूस कॉलनी, कटकटगेट) असे आरोपीचे नाव आहे. इम्रान मेहदी याला २७ आॅगस्ट रोजी न्यायालयात हजर केले जाणार होते. त्या दिवशी पोलिसांवर गोळीबार करून मेहदीला पळवून नेण्याचा कट आरोपींनी रचला होता. गुन्हे शाखेने २७ आॅगस्ट रोजी नारेगाव चौकाजवळ सापळा रचून नऊ जणांना अटक करून त्यांच्याकडून गावठी पिस्टल आणि ८ काडतुसे जप्त केली. यात मध्यप्रदेशातून आलेल्या शार्पशूटरचा समावेश होता. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्यानंतर चार दिवसांनी आणखी आफताब ऊर्फ विजय चौधरी आणि मुसा चाऊस यास पकडले. त्यांच्याकडूनही १० काडतुसे आणि एक गावठी पिस्टल हस्तगत करण्यात आले होते. आरोपी शेख सद्दाम हा इम्रान मेहदी समर्थक आहे. तो घटनेच्या दिवशी मध्यप्रदेशातील टोळीच्या संपर्कात होता, यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र तो सारखा पोलिसांना चकमा देत होता. आज दुपारी तो कटकटगेट परिसरात आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, कर्मचारी शिवाजी झिने, राजेंद्र साळुंके, सुनील धात्रक, गजानन मांटे, प्रभाकर राऊत आणि विशाल सोनवणे यांच्या पथक ाने आरोपीला बेड्या ठोकल्या.