अतिरिक्त प्रसूती रजेमुळे महिला वाहकांना मिळते सुरक्षित मातृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 03:11 PM2019-06-20T15:11:35+5:302019-06-20T15:15:31+5:30
गरोदरपणात बसमधील कर्तव्यामुळे महिला वाहकांना गर्भपाताला सामोरे जाण्याची दुर्दैवी वेळ ओढावत होती.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : एस. टी. महामंडळातील महिला वाहकांना गरोदरपणात सामोरे जावे लागणाऱ्या वेदनांना ‘लोकमत’ने वाचा फोडल्यानंतर गेल्या वर्षभरापासून १८० दिवसांच्या प्रसूती रजेबरोबर त्यांना तीन महिने अतिरिक्त रजा देण्याची अंमलबजावणी होत आहे. यामुळे महिला वाहकांना सुरक्षित मातृत्व प्राप्त होत असून, औरंगाबाद विभागात आतापर्यंत ११ जणांना अतिरिक्त प्रसूती रजेचा आधार मिळाला आहे.
एस. टी. महामंडळातील राज्यभरात काही महिला वाहकांचे अचानक गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने १४ जुलै २०१७ रोजी समोर आणली. या वृत्ताने एस. टी. महामंडळातील महिला वाहकांना सामोरे जाव्या लागणाऱ्या गंभीर प्रश्नाला वाचा फुटली आणि याविषयी सर्व स्तरातून तीव्र पडसाद उमटले. या घटनेचा निषेध व्यक्त करीत महिला वाहकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात आली.
याचा ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा केला. अखेर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आॅगस्ट २०१७ मध्ये महिला कर्मचाऱ्यांना हक्काच्या प्रसूती रजेबरोबरच बाळाच्या संगोपनासाठी तीन महिने अतिरिक्त रजा देण्याची घोषणा केली. मात्र, पाच महिने उलटूनही प्रशासनाकडून परिपत्रक निघाले नसल्यामुळे अतिरिक्त रजेची अंमलबजावणीच झाली नाही. फक्त घोषणाच झाल्याने महिला कर्मचाऱ्यांतून संताप व्यक्त झाला. याविषयीदेखील १ फेब्रुवारी २०१८ रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर वर्षभरापूर्वी २३ मार्च २०१८ रोजी अंमलबजावणीचे परिपत्रक निघाले आणि हजारो महिला वाहकांना दिलासा मिळाला.
औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत एका महिला वाहकाला अतिरिक्त रजेचा लाभ मिळाला आहे. तर सध्या १० महिला वाहक रजेवर आहेत, अशी माहिती एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. गरोदरपणात बसमधील कर्तव्यामुळे महिला वाहकांना गर्भपाताला सामोरे जाण्याची दुर्दैवी वेळ ओढावत होती. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासह गरोदर महिला वाहकांना महामंडळाने टेबल वर्क मिळाले पाहिजे, अशीही मागणी करण्यात आली होती. त्याचीदेखील अंमलबजावणी होत असल्याने महिला वाहकांना दिलासा मिळत आहे.
लढा यशस्वी
महिला वाहकांच्या सुरक्षित मातृत्वासाठी उभारलेला लढा यशस्वी झाला. अनेक महिला वाहकांना त्याचा लाभ मिळत आहे. तीन महिने अतिरिक्त रजा मिळाल्याने शिशूंकडे अधिक चांगल्या पद्धतीने लक्ष देता येते. यासाठी ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा केला. त्यामुळे महिला वाहकांना सुरक्षित मातृत्वाचा हक्क मिळाला. - शीला नाईकवाडे, केंद्रीय उपाध्यक्षा, महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना