कोचिंग क्लासेसमधील मुलींची सुरक्षा ‘फास्ट ट्रॅक’वर; दामिनी पथक क्लास संचालकांच्या भेटीला
By राम शिनगारे | Published: November 19, 2022 12:22 PM2022-11-19T12:22:03+5:302022-11-19T12:23:08+5:30
उस्मानपुरा पोलिस करणार सुरक्षेचे ‘ऑडिट’
- राम शिनगारे
औरंगाबाद : शहरातील कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणीसाठी जाणाऱ्या मुली-मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रिक्षाचालकाने मुलीची छेड काढल्यानंतर पोलिस आयुक्तांनी दामिनी पथकाला प्रत्येक क्लासेसच्या संचालकांची भेट घेत तेथे शिक्षण घेणाऱ्या मुलींमध्ये जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत, तर उस्मानुपरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील क्लासेसची शिक्षण विभागाच्या नियमानुसार सुरक्षेसाठी तपासणी केली जाणार असल्याची माहिती उस्मानुपरा ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली.
उस्मानपुरा येथील क्लास संपवून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीची चालकाने छेड काढल्यामुळे तिने धावत्या रिक्षातून थेट उडी घेतल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे शहर वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांपासून रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याशिवाय पोलिस आयुक्तांनी दामिनी पथकाला शहरातील क्लासेसची यादी तयार करून संचालकांची भेट घेत मुलींच्या सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दामिनी पथकाच्या प्रमुख सहायक निरीक्षक सुषमा पवार यांच्या नेतृत्वात केबीसी, बनसोड, देशपांडे केमेस्ट्री, विद्यालंकार, रिलायबल, सारथी, शिवाना, अनुप्रास या क्लासेसला भेटी देऊन संचालकांसोबत मुलींमध्ये जनजागृती करण्याविषयी मार्गदर्शन केले आहे. त्याशिवाय गायकवाड क्लासेसच्या शहरातील चार शाखा, ध्यास स्पर्धा परीक्षा केंद्र, राजलक्ष्मी लॅडमार्क अभ्यासिकेलाही भेट दिल्याची माहिती सहायक पाेलिस निरीक्षक सुषमा पवार यांनी दिली. येत्या काही दिवसांमध्ये सर्वच क्लासेसला भेटी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रिक्षाचालक, मालकांसाठी स्वतंत्र पथक
वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांनी रिक्षा युनियनची बैठक पोलिस आयुक्तालयात घेतली. या बैठकीत प्रवाशांसोबत गैरवर्तन, महिला प्रवाशांना चांगली वागणूक, मद्यपान करून वाहन चालवू नये, जास्त क्षमतेने प्रवासी वाहतूक करू नये, अस्ताव्यस्त पार्किंग, भरधाव वाहन चालविणे, वाहनात स्पीकर लावणे यासारखी कृत्ये करू नयेत, ड्रेस परिधान करावा, रिक्षाची कागदपत्रे जवळ बाळगत अटींचे उल्लंघन करू नये, अशा सूचना दिल्या. त्यासाठी पोलीस विभागाने स्वतंत्र पथकाची स्थापना केल्याचेही उपायुक्त गिते यांनी सांगितले.
६१२ रिक्षांवर दंडात्मक कारवाई
वाहतूक पोलिसांनी पाचही विभागांत नियमांचा भंग करणाऱ्या ६१२ चालकांना ४ लाख ६० हजार ५०० रुपयांचा दंड केला आहे. त्याशिवाय २८३ कलमानुसार ७ ऑटो चालकांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ही कारवाई निरीक्षक मनोज बहुरे, जनार्दन साळुंके, सपोनि नितीन कामे यांच्या पथकांनी केली.
असे आहे क्लास संचालकांचे म्हणणे...
विद्यार्थिनींना विश्वासात घेत पालकांसोबत बैठक घेऊन त्यांच्या काही समस्या असतील, तर त्या सोडविल्या जातात. विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांच्याशी वारंवार संवाद साधला जातो.
- मृणालिनी गंगाखेडकर, संचालक, जीडी बायलॉजी क्लास
क्लासमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मुलींच्या जनजागृतीसाठी दामिनी पथकाचा कार्यक्रमही नुकताच घेतला. त्याशिवाय मुलींच्या समस्या सोडविण्यासाठी क्लासमध्ये महिलांची एक समितीच नेमली आहे. त्या माध्यमातून मुलींच्या सुरक्षेसह समस्यांची सोडवणूक केली जाते.
- यशवंत चव्हाण, संचालक, चव्हाण केमिस्ट्री क्लास
प्रत्येक आठवड्याला पालकांची बैठक घेतली जाते. त्या बैठकीत मुलींच्या समस्यांची सोडवणूक केली जाते. क्लासमधील मुलींसाठी ‘स्टुडंट केअर’ विभाग सुरू केला आहे. त्याशिवाय पूर्ण परिसर सीसीटीव्हीने केला असून, क्लास संपल्यानंतर घरी जाण्याच्या सूचना दिल्या जातात. परिसरात थांबू दिले जात नाही.
- प्रा. रामदास गायकवाड, संचालक, गायकवाड क्लासेस
महिनाभरातील वादग्रस्त घटना
- उस्मानपुऱ्यात एका क्लासमधून नाश्ता करण्यासाठी गेलेल्या मुलाला तीन जणांनी बेदम मारहाण केली.
- एका मुलाला बहिणीची छेड काढल्याचा बहाणा करून रेल्वे रुळांकडे नेऊन दोन जणांनी लुटले.
- क्लासमधून घरी जाणाऱ्या मुलीची रिक्षातच काढली छेड. त्यामुळे मुलीने रिक्षातून उडी घेतली.
- एका मुलीची क्लासमधील मुलाने छेड काढल्याचे प्रकरण उस्मानपुरा ठाण्यात पोहोचले.