पाचोड ग्रामपंचायतीवर सलग सहाव्यांदा भगवा फडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:03 AM2021-01-19T04:03:56+5:302021-01-19T04:03:56+5:30
पाचोड़ : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पाचोड ग्रामपंचायतीचा सोमवारी निकाल लागला. पुन्हा एकदा ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून ...
पाचोड़ : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पाचोड ग्रामपंचायतीचा सोमवारी निकाल लागला. पुन्हा एकदा ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून हा विजय सहाव्यांदा झाला आहे. सतरापैकी सतरा जागांवर शिवसेनेचा विजय झाला आहे.
पाचोड ग्रामपंचायत सलग पंचवीस वर्षांपासून पैठणचे आमदार व राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या ताब्यात आहेत. ग्रा.पं. निवडणूक जाहीर होताच संदीपान भुमरे यांच्या विरोधकांनी म्हणजे भाजपचे ॲड. बद्रीनारायण भुमरे, रणवीर नरवडे, रणजित नरवडे यांनी निवडणुकीत आपले पॅनेल उभे केले. यंदाच्या निवडणुकीत चुरशीची लढाई होती. शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आलेले होते. उर्वरित १४ जागांसाठी मतमोजणी झाली. एकूण सतराच्या सतरा जागांवर शिवसेनेच्या पॉनलने विजय मिळविला आहे.
हे आहेत विजयी उमेदवार....
राजुनाना भुमरे, शिवराज भुमरे, शिवाजी भालसिंगे, भास्कर दळवी, राहुल नारळे, रहीम बागवान, दत्ता शेळके, दिनेश घुले, भागीत्राबाई नरवडे, मनीषा तारे, अर्चना भुमरे, सरिता धारकर, अरुणा शेळके, सुभद्राबाई खरात, सावित्रीबाई भोजणे, सहाना शेख, रशिदा शेख हे उमेदवार विजयी झाले आहेत. विरोधकांच्या चारीमुंड्या चित केल्याची वार्ता कळताच पाचो़ड गावात शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.
--------
पाचोड ग्रामपंचायतीमध्ये पंचवीस वर्षांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. आज लागलेल्या निकालावरून पाचोडवासीयांनी पुन्हा शिवसेनेला कौल दिला आहे. याचे सर्व श्रेय मतदार बांधवांना, शिवसैनिकांना जाते. गावात आपली सत्ता, तर राज्यात देखील आपलीच सत्ता आहे. त्यामुळे पुन्हा गावाचा विकास अधिक जोमाने होईल. सहाव्यांदा पाचोड ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
- आमदार संदिपान भुमरे
----------
फोटो : पाचोड़ ग्रामपंचायतीत विजयी उमेदवारांसोबत मंत्री संदीपान भुमरे सह अन्य गावकरी.