सागर, स्वप्नील यांनी दर्जेदार खेळाडू घडवावेत : राजेंद्र दर्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:28 AM2018-03-08T00:28:38+5:302018-03-19T13:30:57+5:30
मानाचा असा शासनाचा प्रतिष्ठित शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारे औरंगाबादेतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू सागर मगरे आणि स्वप्नील तांगडे यांनी खेळाडू म्हणून त्यांची कारकीर्द गाजवली आहे. आता त्यांनी भविष्यात प्रशिक्षकाच्या भूमिकेत औरंगाबाद येथून दर्जेदार खेळाडू घडविण्यात योगदान द्यावे, अशी अपेक्षा लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केली. औरंगाबाद जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे सागर मगरे आणि स्वप्नील तांगडे या दोघांना नुकताच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा बुधवारी गजानन महाराज भवन येथे लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते एका सोहळ्यात सत्कार करण्यात आला.
औरंगाबाद : मानाचा असा शासनाचा प्रतिष्ठित शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारे औरंगाबादेतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू सागर मगरे आणि स्वप्नील तांगडे यांनी खेळाडू म्हणून त्यांची कारकीर्द गाजवली आहे. आता त्यांनी भविष्यात प्रशिक्षकाच्या भूमिकेत औरंगाबाद येथून दर्जेदार खेळाडू घडविण्यात योगदान द्यावे, अशी अपेक्षा लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केली.
औरंगाबाद जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे सागर मगरे आणि स्वप्नील तांगडे या दोघांना नुकताच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा बुधवारी गजानन महाराज भवन येथे लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते एका सोहळ्यात सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी अखिल भारतीय तलवारबाजी महासंघाचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे, राज्य संघटनेचे सचिव उदय डोंगरे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष एस. पी. जवळकर, सचिव दिनेश वंजारे, बबन डिडोरे आणि नगरसेवक राजू वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते राष्ट्रीय निवड समितीवर सदस्य म्हणून निवड झालेले डॉ. उदय डोंगरे आणि तलवारबाजी खेळात पीएच.डी. करणारे दिनेश वंजारे यांचाही सत्कार करण्यात आला. स्वप्नील तांगडे आणि सागर मगरे यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी केली. स्वप्नील जागतिक पातळीवरही खेळला. त्यामुळे या शहराचा नागरिक म्हणून आपल्याला आनंद वाटतोय. हे दोघेही प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत. या दोघांनी तलवारबाजी खेळातील दर्जेदार खेळाडू घडवावे व त्यांना सर्व सहकार्य करतील, अशी अपेक्षा आहे. या दोघांना मिळालेल्या पुरस्कारामुळे तलवारबाजी संघटनेचेही कौतुक वाटते, असेही या प्रसंगी राजेंद्र दर्डा यांनी सांगितले.
प्रास्ताविक राज्य संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे यांनी केले. राजेंद्र दर्डा यांचा पाठिंबा आणि मार्गदर्शन तलवारबाजी संघटनेला नेहमीच असते. औरंगाबाद शहराने ५ शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि २५ ते ३0 आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले आहेत. औरंगाबाद शहरात आॅलिम्पियन खेळाडू घडवण्याचे आमचे ध्येय असल्याचे उदय डोंगरे यांनी सांगितले. आभार एस. पी. जवळकर यांनी मानले.