साहेब गेले कुणीकडे; आंदोलकांनी चिकटविले समाजकल्याण कार्यालयात दरवाजालाच निवेदन
By विजय सरवदे | Published: October 3, 2023 06:56 PM2023-10-03T18:56:37+5:302023-10-03T18:56:55+5:30
समाजकल्याण कार्यालय रामभरोसे; येत्या १५ दिवसांत योजनांसंबंधीचे नियोजन न केल्यास या कार्यालयावर अधिकार मार्च काढण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : रखडलेल्या योजनांबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना समाजकल्याण कार्यालयात एकही अधिकारी जागेवर दिसले नाहीत, त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी सहायक समाजकल्याण अधिकारी कार्यालयाच्या दरवाजावरच निवेदन चिकटवून निषेध केला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.
यासंदर्भात या संघटनेचे परिवर्तनवादी चळवळ या संघटनेचे अध्यक्ष राहुल मकासरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजाच्या उत्थानासाठी या कार्यालयामार्फत विविध शासकीय योजना राबविल्या जातात. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एकही कनिष्ठ अधिकारी कार्यालयात उपस्थित राहात नाहीत किंवा वरिष्ठ कार्यालयाकडे योजनांसाठी निधीची मागणी करीत नाहीत. त्यामुळे अनेक योजना रखडल्या आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने समाजकल्याण कार्यालयात जमा झाले. त्यावेळी एकही अधिकारी दालनात उपस्थित नव्हता. त्यामुळे कार्यालयाच्या दरवाजाला निवेदन चिकटवून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. येत्या १५ दिवसांत योजनांसंबंधीचे नियोजन न केल्यास या कार्यालयावर अधिकार मार्च काढण्यात येणार आहे.
निवेदनावर स्वाधार योजनेची शिष्यवृत्ती त्या त्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, जातीच्या प्रमाणपत्रास रहिवासी पुरावा ग्राह्य धरला जाऊ नये, ही योजना ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात यावी. शहरात अपुरी जागा असल्यामुळे अनेक महाविद्यालये ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या हद्दीपासून वीस किलोमीटरपर्यंतच्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात यावा. माता रमाई घरकुल आवास योजनेसाठी शहरी भागात देण्यात येणारे अडीच लाखांचे अनुदान पाच लाख रुपये करण्यात यावे. अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील पीडितांच्या पुनर्वसनासाठी तत्काळ निधीची पूर्तता करावी. शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पाच- सहा महिन्यांपासून स्टेशनरी भत्ता मिळालेला नाही. यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. एक हजार विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाचा फलक तत्काळ बसविण्यात यावा.यावेळी प्रकाश उजगारे, आदित्य रगडे, सागर नरवडे, आकाश जंगले, सुमेध खंडागळे, अभिमन्यू अंभोरे, ॲड. कपिल गायकवाड, शैलेश चाबुकस्वार, पवन चव्हाण, आकाश आव्हाड आदी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.