साहित्य संमेलन नाशकात कि दिल्लीत; साहित्यविश्वात जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 01:00 PM2020-12-30T13:00:08+5:302020-12-30T13:04:50+5:30
९४ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन ठिकाणाबद्दल उत्सुकता कायम
औरंगाबाद : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी नाशिक येथून आलेले निमंत्रण साहित्य महामंडळाने स्वीकारले असून, केवळ औपचारिक शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. असे असताना आता दिल्लीकरांनी पत्र पाठवून त्यांच्या निमंत्रणाची पुन्हा एकदा साहित्य महामंडळाला आठवण करून दिली आहे.
९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार की नाही, इथपासून ते कोठे होणार इथपर्यंत चर्चा येऊन ठेपली आहे. काही महिन्यांपूर्वीच दिल्ली येथे साहित्य संमेलन आयोजित करण्याबाबत तेथील सरहद संस्थेने साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांना निमंत्रणाचे पत्र पाठविले होते. दिल्ली सोबतच धुळे आणि नाशिक येथूनही निमंत्रणे मिळाली होती. त्यानंतर मागील आठवड्यातच नाशिक येथील आणखी एका संस्थेने साहित्य संमेलनासाठी निमंत्रण पाठविले होते तर धुळे येथील संस्थेने त्यांचा निमंत्रणाचा प्रस्ताव मागे घेतला होता.
सद्य:स्थितीत साहित्य महामंडळाकडे नाशिक येथील दोन संस्थांकडून आलेले निमंत्रण आणि दिल्लीच्या सरहद संस्थेचे निमंत्रण आहे. यामध्ये नाशिकचे पारडे जड असल्याची चर्चा साहित्य वर्तुळात सुरू आहे. हीच चर्चा थेट दिल्लीपर्यंत पाेहोचल्यामुळे साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत दिल्लीचा विचारही आवर्जून करावा, अशी आठवण देणारे पत्र सरहद संस्थेने पाठविले आहे. एप्रिलपर्यंत कोरोनाचे संकट आटोक्यात येणार असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे २०२१ पासून तीन दिवसीय साहित्य संमेलन दिल्ली येथे घेण्याची तयारी सरहद संस्थेकडून दाखविली जात आहे.
बैठक केवळ नावालाच का?
नाशिकला संमेलन होणार, असा दिल्लीकरांचा गैरसमज झाला आहे, असे डॉ. दादा गोरे यांनी सांगितले. ३ जानेवारी रोजी बैठकीत निर्णय होईल, असेही त्यांनी नमूद केले आणि ५ रोजी नाशिक येथे काही सदस्य भेट देऊन पाहणी करणार आहेत, असेही ते म्हणाले. मग जर ३ रोजी स्थान निश्चितीबाबत निर्णय होणार असेल तर ५ रोजी सदस्य नाशिकला पाहणीला जातील, हे कसे ठरले? त्यामुळे मग ३ जानेवारीची बैठक केवळ नावालाच असणार आहे का, असा प्रश्नही साहित्य वर्तुळात विचारला जात आहे.
३ जानेवारीला निर्णय घेऊ
साहित्य संमेलन कुठे घ्यायचे, याविषयी साहित्य महामंडळाच्या सदस्यांची बैठक दि. ३ जानेवारी रोजी मराठवाडा साहित्य परिषद येथे होणार आहे. एकूण १८ सदस्यांपैकी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यासह इतर दोन जण प्रकृती अस्वस्थतेमुळे बैठकीला येऊ शकणार नाहीत. त्यामुळे बैठकीला उपस्थित उर्वरित सदस्यांपुढे दिल्ली आणि नाशिक असे दोन्ही प्रस्ताव ठेवले जातील आणि सर्वानुमते निर्णय घेतला जाईल.
- डॉ. दादा गोरे, कार्यवाह, अ.भा. मराठी साहित्य महामंडळ