वारकऱ्यांच्या सेवेचा साईप्रसादचा संकल्प
By Admin | Published: April 18, 2016 12:28 AM2016-04-18T00:28:40+5:302016-04-18T00:40:26+5:30
नांदेड : साईप्रसाद संस्थेने आगामी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे वारीतील तब्बल चार लाख भाविकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा संकल्प केला आहे़
नांदेड : पदाधिकारी नसलेली, प्रसिद्धीपासून दूर आणि समाजकार्यात अग्रेसर असलेल्या साईप्रसाद संस्थेने आगामी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे वारीतील तब्बल चार लाख भाविकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा संकल्प केला आहे़ सर्वेक्षणानुसार वारीमध्ये दूषित पाण्यामुळे दरवर्षी हजारो वारकरी आजारी पडतात़ त्यामुळे वारकऱ्यांना मिनरल वॉटरचे पाणी देण्यासाठी साईप्रसादने तयारी सुरु केली असून त्याचा अंदाजित खर्च जवळपास ५० लाख रुपये आहे़
साईप्रसादच्या वतीने गतवर्षी आत्महत्याग्रस्त व गरीब शेतकरी कुटुंबातील ५१ मुलींचे लग्न लावण्यात आले होते़ यंदाही फेब्रुवारीमध्ये अशाच ६३ जोडप्यांचे शुभमंगलही साईप्रसादच्या मदतीने पार पडले़ या संस्थेत वर्ग-१, २ चे निवृत्त अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक, डॉक्टर, व्यापारी यासह शेकडो सामान्य नागरिकांचा समावेश आहे़
यापूर्वी २०१५ मध्ये पालखी सोहळ्यात श्री बाबा महाराज सातारकर यांच्या दिंडी सोहळ्यातील जवळपास अडीच हजार वारकऱ्यांसाठी साईप्रसादच्या वतीने शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती़
त्यामुळे पूर्ण वारीकाळात या दिंडीतील एकही वारकरी आजारी पडला नाही़ पुढील यात्रा ही जूनमध्ये आहे़ या वारकऱ्यांना मिळेल त्या ठिकाणचे पाणी पिऊन आपली तहान भागवावी लागते़ त्यामुळे वारीमध्ये अनेक जण आजारी पडतात़
त्यामुळे वारीतील ४ लाख भाविकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी साईप्रसादने आतापासूनच तयारी सुरु केली आहे़ नांदेडात साईप्रसादचे एक हजार सदस्य असून त्यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे़ त्यासाठी पाच हजार लिटर प्रतितास पाणी फिल्टर करणारा प्लांट, २ हजार लिटर पाणी साठविण्यासाठी टाक्या, २०० स्वयंसेवक, १२ ट्रक, १ ट्रेलर, १० हजार लिटरचे पाण्याचे पाच टँकर, जनित्र, दहा तंबू, पाण्याच्या २० मोटारी, स्टीलचे २ हजार ग्लास आदी अनेक साहित्याची गरज आहे़ त्या सर्वांवर मिळून जवळपास ५० लाखांचा खर्च होणार आहे़ पंढरपूरमध्ये दर्शनाच्या रांगेत उभी असलेली जवळपास ८ ते १० वारकरी मंडळी ४० तास रांगेत असतात़ त्यांच्याकरिताही शेवटच्या दोन दिवसांत शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे़ वारीनंतर पुढील अकरा महिने हा वॉटर प्लांट शासकीय रुग्णालयात बसविण्यात येणार आहे़ जेणेकरुन रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची सोय होईल़ नांदेडात विविध समाजपयोगी उपक्रम राबवून आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या साईप्रसादने वारकऱ्यांच्या सेवेसाठी उचललेल्या या पावलाला नांदेडकरांनीही हातभार लावावा, असे आवाहन साईप्रसादच्या वतीने करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)