‘बाटू’कडे जाण्याच्या तयारीत ‘साई’; ना-हरकत प्रमाणपत्रासाठी केला अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:54 PM2018-06-15T12:54:58+5:302018-06-15T12:56:21+5:30

साई महाविद्यालय प्रशासनाने रायगड जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) संलग्नीकरण मिळविण्यासाठी ‘ना हरकत’ (नो-ड्यूज) देण्यासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

'Sai' ready for 'Batu' affilation; Application filed for non-objection certificate in university | ‘बाटू’कडे जाण्याच्या तयारीत ‘साई’; ना-हरकत प्रमाणपत्रासाठी केला अर्ज दाखल

‘बाटू’कडे जाण्याच्या तयारीत ‘साई’; ना-हरकत प्रमाणपत्रासाठी केला अर्ज दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देहा प्रस्ताव प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्याकडे दाखल झाला असून, ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- राम शिनगारे

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने साई इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे संलग्नीकरण टप्प्याटप्प्याने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महाविद्यालय प्रशासनाने रायगड जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) संलग्नीकरण मिळविण्यासाठी ‘ना हरकत’ (नो-ड्यूज) देण्यासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा प्रस्ताव प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्याकडे दाखल झाला असून, ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विद्यापीठाने एप्रिल-मे २०१७ मध्ये घेतलेल्या अभियांत्रिकीच्या परीक्षेत चौका येथील ‘साई’महाविद्यालयात झालेल्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांचे सील तोडून विद्यार्थ्यांना मध्यरात्री लिहिण्यास दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. शिवसेना नगरसेवकाच्या घरात उत्तरपत्रिका लिहीत असताना विद्यार्थ्यांना १६ मे २०१७ च्या मध्यरात्री पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. या घटनेमुळे विद्यापीठाच्या अब्रुची लक्तरे उडाली. कुलगुरूंनी १९ मे रोजी पत्रकार परिषद घेऊन परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यासह महाविद्यालयाची संलग्नता कायमस्वरुपी रद्द करण्याची घोषणा केली. मात्र पुढे नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवाल आणि विधिज्ञांच्या सल्ल्यानुसार महाविद्यालयाचे संलग्नीकरण टप्प्याटप्प्याने रद्द करण्याचा निर्णय घेतला.

यानुसार पहिल्या वर्षासाठीचे संलग्नीकरण २०१७-१८ शैक्षणिक वर्षात रद्द केले. याविषयीचे पत्र राज्य तंत्रशिक्षण परिषदेला दिले. मागील वर्षी ‘साई’त एकही प्रवेश झाला नाही. यावर्षीही विद्यापीठ प्रशासनाने ‘साई’त प्रवेश देण्यात येऊ नये, असे पत्र तंत्रशिक्षण विभागाला काही दिवसांपूर्वीच दिले. यामुळे ‘साई’च्या प्रशासनाने या विद्यापीठाऐवजी रायगड जिल्ह्यातील ‘बाटू’चे संलग्नीकरण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे समजते. याचाच भाग म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. ‘बाटू’शी संलग्न होण्यापूर्वी संबंधित विद्यापीठाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. यामुळे तशा पद्धतीचा प्रस्ताव विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि अकॅडेमिक विभागात दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले. यावर आता विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर काय निर्णय घेतात, याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अद्याप कोणताही निर्णय नाही
साई इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या ‘ना-हरकत’ प्रमाणपत्रासंदर्भात प्रस्ताव मिळाला आहे. यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. हा प्रस्ताव विधि विभागाकडे पाठविला जाईल. विधि विभागाच्या अभिप्रायानंतर ना- हरकतसंबंधी निर्णय घेण्यात येईल.
- डॉ. अशोक तेजनकर, प्रकुलगुरू

Web Title: 'Sai' ready for 'Batu' affilation; Application filed for non-objection certificate in university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.