साजापूर-करोडी सरपंच,उपसरपंचासह १२ सदस्य अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:02 AM2021-03-17T04:02:57+5:302021-03-17T04:02:57+5:30

वाळूज महानगर : नियमबाह्य ठराव पारित केल्याप्रकरणी साजापूर-करोडी ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचासह सर्व १२ सदस्यांना अपर विभागीय आयुक्तांनी अपात्र ...

Sajapur-Crore Sarpanch, 12 members including Deputy Sarpanch ineligible | साजापूर-करोडी सरपंच,उपसरपंचासह १२ सदस्य अपात्र

साजापूर-करोडी सरपंच,उपसरपंचासह १२ सदस्य अपात्र

googlenewsNext

वाळूज महानगर : नियमबाह्य ठराव पारित केल्याप्रकरणी साजापूर-करोडी ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचासह सर्व १२ सदस्यांना अपर विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरविले होते. या निर्णयाच्या विरोधात सरपंचाने दाखल केलेले अपील ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी फेटाळल्याने या ग्रामपंचायतीचा नव्याने निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या ग्रुप ग्रामपंचायतीची तीन वर्षांपूर्वी १३ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत अंकुश राऊत यांची थेट जनतेमधून सरपंच म्हणून निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत सुरु असताना २० जानेवारी व २ फेब्रुवारी २०१८ मध्ये मासिक बैठकीत घर बांधकाम व कारखाने उभारण्यास नियमबाह्यपणे ठराव घेऊन मंजुरी दिली होती. वास्तविक बांधकाम परवानगी देताना जिल्हाधिकारी यांची अकृषिक परवानगी तसेच हा परिसर सिडको व एमआयडीसी हद्दीत येत असल्याने संबंधित विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे; मात्र सरपंच व पदाधिकाऱ्यांनी नियम डावलून ठराव पारित केल्याने या ग्रामपंचायतीचे सदस्य शेख ईस्माईल यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आदीकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनंतर चौकशीत सरपंच व पदाधिकाऱ्यांनी नियमबाह्यपणे ठराव पारित केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अपर विभागीय आयुक्त विजयकुमार फड यांनी गत वर्षी ६ फेब्रुवारीला सरपंच अंकुश राऊत, उपसरपंच शेख युसूफ, सय्यद बिस्मिल्ला, उत्तम पन्सोडे, शेख मैनुबी, देविदास गवांदे, भिवसन जाधव, वर्षा जाधव, शेख मुसा, शोभाबाई जाधव, शेख फरीन, पार्वताबाई नवले आदींना अपात्र ठरविले होते.

ग्रामविकास मंत्र्यांनी सरपंचाचे अपील फेटाळले

अपर विभागीय आयुक्त विजयकुमार फड यांच्या निर्णयाच्या विरोधात सरपंच अंकुश राऊत यांनी ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे अपील दाखल केले होते. या प्रकरणी मंत्रालयात नुकतीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी करण्यात आली. या सुनावणीत सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८चे कलम ३९(१) नुसार सरपंच, सदस्य दोषी आढळल्याने ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपर विभागीय आयुक्तांनी केलेली कार्यवाही योग्य ठरविली. अपिलार्थी सरपंच अंकुश राऊत यांचे अपील अमान्य करुन अपर विभागीय आयुक्त विजयकुमार फड यांनी ६ फेब्रुवारी २०२० रोजी पारित केलेला आदेश कायम करण्यात आला.

ग्रामपंचायत निवडणुकीचा मार्ग मोकळा

साजापूर-करोडी या ग्रुप ग्रामपंचायतीचा अजून २ वर्षांचा कार्यकाल बाकी आहे. सरपंच व पदाधिकाऱ्यांनी नियमबाह्य ठराव पारित केल्याने त्यांना पदावरुन पायउतार व्हावे लागले आहे. शासनाकडून अपील फेटाळण्यात आल्यानंतर कायदेशीर मार्गही बंद झाल्याने या ग्रामपंचायतीचा नव्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

--------------------------- -

Web Title: Sajapur-Crore Sarpanch, 12 members including Deputy Sarpanch ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.