गौरी-गणपतीसाठी सजली बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:49 AM2017-08-22T00:49:49+5:302017-08-22T00:49:49+5:30
रावण अमावास्या अर्थातच पोळा सण साजरा करून श्रावणोत्सव संपला आणि भाद्रपदाच्या आगमनाने सर्वांना गणरायाचे आणि महालक्ष्मीच्या उत्सवाचे वेध लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बैल पोळ्याच्या तोंडावर आलेल्या पावसाने बळीराजाला सुखावले आणि सर्वत्र पोळ्याचा उत्साह पाहायला मिळाला. श्रावण अमावास्या अर्थातच पोळा सण साजरा करून श्रावणोत्सव संपला आणि भाद्रपदाच्या आगमनाने सर्वांना गणरायाचे आणि महालक्ष्मीच्या उत्सवाचे वेध लागले. अवघ्या चार दिवसांवर गौरी-गणपतीचा सण येऊन ठेपला आहे. दि. २५ आॅगस्ट रोजी गणराय, तर दि. २९ आॅगस्ट रोजी महालक्ष्मीचे आगमन होत आहे. या निमित्ताने सर्वत्र जय्यत तयारीला सुरुवात झाली असून, गौरी-गणपतीच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजली आहे.
या दोन्ही उत्सवांमध्ये सर्वात जास्त महत्त्व असते ते सजावटीला. त्यामुळेच गणेशाच्या मूर्ती, महालक्ष्मीचे मुखवटे यांच्याइतकीच मागणी सजावटीच्या साहित्यालाही दिसून येत आहे. गणपती आणि महालक्ष्मीला लागणारे वेगवेगळे हार, मुकुट, पूजेचे आकर्षक सामान, वेगवेगळ्या प्रकारचे मखर, विविध प्रकारची तोरणे अशा विविधरंगी वस्तूंनी बाजारपेठ फुलून गेली आहे. गणपतीसाठी थर्माकोलच्या मखरांना जास्त मागणी असल्याचे दिसून येते. हे मखर अन्य मखरांच्या तुलनेत स्वस्त आहेत. यामध्ये मंदिर, कमळ, सिंहासन असे विविध आकार उपलब्ध आहेत. १५० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत याच्या किमती दिसून येत आहेत. महालक्ष्मीसाठी कापडी मखरांमध्ये विविध प्रकार पाहायला मिळतात.
गौरी-गणपतीसाठीचे अनेक आकर्षक दागिनेही महिला वर्गाला खुणावत आहेत. मोत्यांचे, फुलांचे हार आणि या हारांना मध्यभागी मोठे पदक असे आपण नेहमीच पाहतो; पण यंदा मात्र हिरव्या पानांचे हार आणि पदकाच्या जागी आंबा, सफरचंद, संत्री या फळांचे पदक असे नावीन्यपूर्ण हार बाजारात आले आहेत. यंदाही ‘जय मल्हार’ पगडीला विशेष पसंती मिळेल, असा कयास आहे. याशिवाय महालक्ष्मीच्या साड्या, कपडे यांचे असंख्य प्रकार बाजारात पाहायला मिळतात.